Khopoli News: मनोज जरांगे पाटलांचा 18 सप्टेंबरला खोपोलीत मुक्काम! आंदोलकांसाठी काय आहेत खास सोयी-सुविधा?
Khopoli News: १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धडकण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा १८ सप्टेंबरला खोपोलीतील ताकई येथे रात्रीचा मुक्काम.
Khopoli News – मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा (दि. १९) सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर पोहचणार आहे. यासंबंधी अंतरवाली सराटी येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबई दौऱ्याचा आणि मार्गाचा अधिकृत आराखडा जाहीर केला आहे. त्यानुसार चौथा मुक्काम शुक्रवार दि.१८ सप्टेंबर रोजी खोपोली येथे होणार आहे,
जरांगे पाटलांसोबत लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मराठा आंदोलकांची व्यवस्था ताकई येथील धाकटी पंढरीच्या मैदानात करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समन्वयक डॉ.सुनिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मुंबई – पुणे महानगराच्या मध्यवर्ती खोपोली शहर आहे. दोन्हीही एक्सप्रेसवे ही या शहरातून जातो,
तसेच मोठ्या प्रमाणात मराठा समाज याठिकाणी असल्याने चौथा मुक्काम खोपोली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सकल मराठा समाजाची बैठक धाकटी पंढरीत झाली. याप्रसंगी सकल मराठा समन्वयक डॉ.सुनिल पाटील, विनोद साबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, शंकर थोरवे, मधुकर घारे, नगरसेविका विनिता कांबली, नगरसेवक हरिश काळे, माजी नगरसेवक राजू गायकवाड, अनंता पाटील, रामदास घरत,
सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते किरण हाडप, संकेत हाडप, केतन निकम, भरत पाटील, शशिकांत मोरे, अँड.भगवान लाले, दीपक हाडप यांच्यासह अन्य मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल पाटील, खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन हिरे उपस्थित राहून नियोजनाचा आढावा घेतला.
मराठा आंदोलकांना मुक्कामासाठी ताकई येथील धाकटी पंढरीचा मैदान निश्चित करण्यात आल्यावर याठिकाणी रात्रीच्या विश्रांतीची सोय तसेच जेवण, पाणी, शौचालय आदि सुविधा उपलब्ध करण्यासाठी सकल मराठा समाज बांधव तयारीला लागले असल्याचे डॉ.सुनिल पाटील यांनी सांगितले.





