Suicide Case : नैराश्यातून खो-खोपटूची आत्महत्या; काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी केली होती अटक
Suicide Case : करांडे मूळचा बीड जिल्ह्यातील खडकी देवळा गावचा रहिवासी

पुणे : बीड येथील राष्ट्रीय स्तरावरील खो-खोपटू तुकाराम गंगाधर करांडे (वय २८) याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. गुलटेकडी भागात मंगळवारी ही घटना घडली.
करांडे मूळचा बीड जिल्ह्यातील खडकी देवळा गावचा रहिवासी होती. तो बीडमधील स्वराज्यनगर भागात राहत होता. राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत तो सहभागी झाला होता. काही दिवसांपूवी तो पुण्यात आला होता.
गुलटेकडी भागात तो मित्रांसोबत राहत होता. मंगळवारी रात्री त्याचे मित्र कामानिमित्त बाहेर पडले. तेव्हा त्याने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
15 दिवसांपूर्वी बीड शहरात करांडे याला बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो नैराश्यात होता. या प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर तो पुण्यातील गुलटेकडी भागात राहणाऱ्या मित्रांकडे राहायला आला. प्राथमिक चौकशीत त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.





