Khelo India Youth Games 2023 : कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ पराभूत…

Khelo India Youth Games 2023 in Chennai :- महाराष्ट्र संघाने शुक्रवारी झालेल्या साखळी फेरीतील दोन्ही लढती गमावल्या. मुलांच्या संघाला राजस्थान संघाने तर मुलींच्या संघाला हरयाणा संघाने पराभूत करताना सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये आगेकूच केली. या पराभवामुळे पुढील दोन्ही लढतींमध्ये महाराष्ट्राला विजयाची आवश्यकता असणार आहे. उद्याच्या लढतींमध्ये मुलींसमोर तामिळनाडू तर मुलांसमोर मध्यप्रदेश संघाचे आव्हान असणार आहे.
चेन्नई येथील जवाहर नेहरू इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या आजच्या लढतीमध्ये मुलींच्या गटातून हरयाणा संघाने महाराष्ट्राला ४५-४० असे ५ गुणांच्या फरकाने पराभूत केले. महाराष्ट्र संघाने आक्रमक सुरुवात कराताना मध्यंतराला २३-१३ अशी आघाडी घेतली होती. यामध्ये महाराष्ट्राची कर्णधार हरजित कौर संधू, आर्या पाटील यांनी चढाया तर भूमिका गोरेने पकडी करताना १८ गुणांची कमाई करून दिली होती. यामुळेच मध्यंतराला महाराष्ट्राने १० गुणांची आघाडी घेतली होती.
मध्यंतरानंतर हरयाणा संघाने खेळ उंचावला. कोमल कुमारीने २ वेळा ४ गुणांची चढाई करताना पहिल्या ४ मिनिटांमध्येच संघाला आघाडी मिळवून दिली. या चढायानंतर महाराष्ट्राच्या संघाला पुन्हा आघाडी घेता आली नाही. मध्यंतरानंतर महाराष्ट्राने १७ गुणाची कमाई केली तर हरयाणा संघाने ३२ गुण मिळविताना विजय साकारला.
मुलांच्या गटाच्या लढतीत राजस्थान संघाने महाराष्ट्रावर ३४-२८ अशी ६ गुणांनी मात केली.
#FIHOlympicQualifiers2024 : भारतीय महिला हाॅकी संघाचे पॅरिस ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले…
आजच्या लढतीत सुरुवातीपासून महाराष्ट्राच्या खेळाडूंना लय सापडली नाही. राजस्थान संघाने आक्रमक पावित्रा घेताना मध्यंतराला २०-१२ अशी तब्बल ८ गुणाची आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर महाराष्ट्राच्या अनुज गावडे, वरून खंडागळे व विशाल ब्राम्हणे यांनी खेळ उंचवला. महाराष्ट्राने मध्यंतरानंतर राजस्थानला आक्रमक प्रत्त्युत्तर देताना १६ गुणांची कमाई केली. परंतू मध्यंतरापूर्वी राजस्थान संघाने घेतलेली आघाडी महाराष्ट्राच्या खेळाडूंना मोडून काढता आली नाही.





