Khelo India Youth Games 2023 : महाराष्ट्राच्या सुवर्णपदकांची गोल्डन जुबली….

चेन्नई– गतविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत अपेक्षेप्रमाणे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत यंदा देखील सुवर्णपदकांची गोल्डन ज्युबली साजरी केली. स्पर्धेच्या १२ व्या दिवशी तिरंदाजी, खो-खो, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन आणि नेमबाजीमध्ये महाराष्ट्राने पदके कमाविताना पदक तक्त्यात इतर राज्यांना आणखी पिछाडीवर टाकले.
तिरंदाजीत आदितीची डबल धमाका
महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ३ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य अशी एकूण ६ पदकांची विक्रमी कामगिरी करीत प्रथमच दोन्ही गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. कंपाऊंड व रिकर्व्ह दोन्ही प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंवी हुकूमत गाजवित दिवस गाजविला.
कंम्पाऊड प्रकारात जागतिक विजेती आदिती स्वामीने वैयक्तिक व मिश्र दुहेरीतील सुवर्णयशाचा वेध घेतला. वैयक्तिक प्रकारात महाराष्ट्र विरूध्द महाराष्ट्र लढत रंगली. सातार्याची आदिती विरूध्द जालनाच्या तेजल साळवे लढतीत अनुभची आदितीने 1 गुणांच्या आघाडीवर बाजी मारली. मिश्र दुहेरीत मानव जाधवने आंध्रप्रदेशचा पराभव केला. रिकर्व्ह प्रकारात पृथ्वीराज घाडगे व शर्वरी शेंडे जोडीने हरियाणाच्या अवनी व अगस्तीसिंगवर 6-2 गुणांची दणदणीत विजय संपादन केला. मुलांच्या कंपाऊड प्रकारात कांस्यपदकाच्या लढतीत बुलढाण्याच्या महिर अपारने राजस्थानच्या सचिन चेचीला पराभूत केले.
वेटलिफ्टिंगमध्ये ग्रिष्मा थोरातला रौप्य
वेटलिफ्टिंग मध्ये ग्रिष्मा थोरात हिने मुलींच्या ७६ किलो वजनी गटात रुपेरी यश संपादन केले तर सार्थ जाधव याने १०२ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले.
खो खो : दोन्ही गटात महाराष्ट्राला विजेतेपद
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील खो-खो मध्ये महाराष्ट्राने मुले व मुली या दोन्ही गटात एकतर्फी विजेतेपद पटकावले आणि निर्विवाद वर्चस्व गाजविले. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिसावर ३३-२४ अशी साडेतीन मिनिटे राखून व नऊ गुणांनी मात केली. महाराष्ट्राच्या मुलांनी अंतिम सामन्यात दिल्ली संघाचा ४० विरुद्ध १० असा दहा गुण व चार मिनिटे राखून दणदणीत पराभव केला.
Khelo India Youth Games 2023 (Day 11) : महाराष्ट्राला 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके…
कुस्ती : महाराष्ट्राला तीन पदके
महाराष्ट्राच्या अर्जुन गादेकरने ८० किलो वजनी गटात दिल्लीच्या नीरजकुमारला पराभूत करताना सुवर्णपदकाची कमाई केली. ५३ किलो मुलींच्या गटातील अंतिम लढतीत सानिका पाटीलला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर अपेक्षा पाटीलने ६५ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली.
बॅडमिंटन: मुलींना सर्वसाधारण उपविजेतेपद
बॅडमिंटनमध्ये मुलींच्या दुहेरी गटात महाराष्ट्राच्या श्रावणी वाळेकर आणि तारिणी सुरी या दोघींनी ओडिसाच्या प्रगती परिडा आणि विशाखा टोप्पो यांच्या जोडीला २१-१३,२०-२२,२१-१६ असे पराभूत करीत सुवर्ण कामगिरी बजावली.





