Khed Tourism: खेडचा पश्चिम भाग पर्यटकांनी गजबजला! निसर्गरम्य भोरगिरी-भीमाशंकर परिसराने घातली भुरळ
Khed Tourism: खेड तालुक्यातील भोरगिरी-भीमाशंकर परिसरातील डोंगराळ भागात जिवंत झरे प्रवाहित; फेसाळणाऱ्या धबधब्यांकडे वीकेंडला पर्यटकांची पावले.

Khed Tourism – निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या खेड तालुक्यातील भोरगिरी-भीमाशंकर परिसरातील धबधबे सध्या खळखळत, फेसाळत वाहू लागले आहेत. पावसाळी वातावरण, दाट धुके, हिरवाईने नटलेला परिसर आणि निसर्गरम्य धबधबे यामुळे वर्षाविहारासाठी पर्यटकांची पावले या भागाकडे वळू लागली आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर-भोरगिरी परिसरातील नयनरम्य धबधबे सुरू झाले असून,
विविध जाती-प्रजातींच्या वनस्पतींनी समृद्ध असलेला हा परिसर पर्यटकांनी गजबजू लागला आहे. कुटुंबासह सुरक्षित वर्षाविहारासाठी भोरगिरी आणि भीमाशंकर परिसराला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. शहरातील पर्यटकांसह तरुणाईचा या परिसराकडे विशेष ओढा आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचीही येथे मोठी गर्दी होत आहे. श्रावण महिन्यात भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणारे भाविक तसेच भोरगिरी येथील श्री कोटेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक धबधब्यांचा आनंद घेतात.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात 3 ते 8 जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील धबधबे पूर्ण क्षमतेने सुरू झाले. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी डोंगरातील जिवंत झरे प्रवाहित असल्याने धबधबे सुरूच राहिले आहेत. शुक्रवारी (दि. 17) झालेल्या जोरदार पावसामुळे धबधब्यांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली असून, हे धबधबे फेसाळत खळखळून वाहत आहेत.
या धबधब्यांकडे पर्यटकांची पावले
खेडच्या पश्चिम भागातील शिरगाव-धुवोली शिवेवरील ‘नेकलेस’ धबधबा, भोरगिरी येथील ‘एन्जॉय पॉईंट’, ‘हरामी’ धबधबा, भोरगडा समोरील ‘पंच धबधबा’, मंदोशी घाटातील उंच धबधबा, कारकुडी येथील एकाखाली एक असलेले तीन धबधबे, भिवेगाव येथील ‘जंगल सफर गोल्डन’ धबधबा आणि येळवळी येथील उंच धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सुरक्षित आणि निसर्गरम्य वातावरणामुळे शहरातील पर्यटक भोरगिरी परिसरातील धबधब्यांना विशेष पसंती देत आहेत.
स्थानिकांना रोजगाराची संधी
पावसाळ्यात खेडच्या पश्चिम भागात येणार्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. अनेक पर्यटक धबधब्यांपर्यंत जाण्यासाठी स्थानिक नागरिकांना मार्गदर्शक म्हणून घेत असल्याने त्यांना आर्थिक उत्पन्न मिळत आहे. काही युवकांनी ठिकठिकाणी चहा-नाश्त्याचे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत, तर काही नागरिकांकडून घरगुती जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांचीही चांगली सोय होत आहे.
हिरवाई, धुके आणि धबधब्यांची भुरळ
भोरगिरी, येळवळी, भिवेगाव, कारकुडी, मोरोशी, मंदोशी, शिरगाव परिसरातील धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. संततधार पाऊस, अधूनमधून येणारे दाट धुके, धुक्यात हरवलेली हिरवाई, फेसाळत वाहणारे धबधबे, रंगीबेरंगी झाडे आणि फुलांनी नटलेला परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील निसर्गरम्य कळमोडी धरण 100 टक्के भरले असून, चासकमान आणि भामा आसखेड धरणेही मोठ्या प्रमाणात भरली आहेत.






