Khed Rain: खेड तालुक्यात पावसाची बॅटिंग! भीमाशंकर-भोरगिरीत मुसळधार; भात खाचरे तुडुंब, शेतकरी राजा सुखावला
Khed Rain: भीमाशंकर परिसरात ५५० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद; सलग तीन दिवसांच्या मुसळधार सरींमुळे ओढे-नाले ओसंडून वाहू लागले.

Khed Rain – भोरगिरी, भीमाशंकर परिसरात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळे खेड तालुक्यातील भात खाचरे भरली असून परिसर नयनरम्य बनला आहे. पावसामुळे चासकमान आणि कळमोडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. भीमाशंकर भोरगिरी परिसरात आणि तालुक्यात सर्वत्र शुक्रवार (दि.३) पासून ते रविवारपर्यंत सर्वदूर पाऊस कोसळत होता. यामुळे भात खाचरे तुडुंब भरली आहेत. यंदा संपूर्ण जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेला.
मागील वर्षी मे महिन्याच्या २० तारखेपासून पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षी मात्र पावसाने पूर्ण जून महिना दडी दिली. त्यामुळे रब्बी हंगामातील भात सोयाबीन आदी पिकाच्या पेरण्या रखडल्या होत्या. धुळवाफेवर झालेल्या भात रोपांच्या पेरण्या काही ठिकाणी दुबार कराव्या लागल्या. परंतु आता पावसाने हजेरी लावल्याने भात रोप तरारली असून भात खाचरे भरल्याने शेतकरी वर्गात समाधान निर्माण झाले आहे.
भोरगिरी-भीमाशंकर परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे चासकमान धरणात भीमा नदीतून येणारे पाणी (येवा) जमा होत आहे. चासकमान धरणात पाणीसाठा १४.८५ टक्के झाला आहे. धरणक्षेत्रात २२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी चास कमान धरण ७० टक्के भरले होते. कळमोडी धरणात आराळा नदीतून येणारे पाणी जमा होत असल्याने कळमोडी धरणात ४७.६७ टक्के भरले आहे.
धरणक्षेत्रात ३१३ मिमी पावसाची नोंद आज पर्यंत झाली आहे. मागील वर्षी कळमोडी धरण १०० टक्के भरले होते. सलग तीन दिवस पडणाऱ्या जोराच्या पावसामुळे तालुक्यातील भीमा, भामा आणि आरळा या नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे. भीमाशंकर परिसरात एक जूनपासून आतापर्यंत सुमारे ५५० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे ओढे-नाले यांना पूर आल्याने नद्यांच्या प्रवाहात वाढ झाली आहे.
भोगिरी परिसरातील धबधबे वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दीला सुरुवात झाली आहे. भीमा नदीतुन चास कमान धरणात सुमारे पाच हजार क्यूसेस वेगाने येवा (पाणी) जमा होत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे चिंतेत असणारे खेड, शिरूर तालुक्यातील पाणी प्रश्न सुटणार आहे.





