Illegal Alcohol : विषारी दारूचा आनखी एक बळी? धामणेतील तरुणाच्या मृत्यूने खळबळ; ग्रामस्थांचा संताप अनावर
Illegal Alcohol : खेड तालुक्यातील म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर दारू धंद्यांचे पेव; कारवाईची मागणी करत ग्रामस्थ आक्रमक.

Illegal Alcohol – खेड तालुक्यातील धामणे येथे गावठी दारूच्या संशयित सेवनानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गावठी दारू विक्रीच्या बेकायदेशीर व्यवसायावर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धामणे येथील बापू मारुती चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 9) गावातील एका ठिकाणाहून गावठी दारूचे सेवन केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली.
नातेवाईकांनी त्यांना तातडीने करंजविहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. धामणे गावातील आसखेड बुद्रुक मार्गावरील निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये दीर्घकाळापासून गावठी दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायामुळे गावातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही प्रभावी कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संशयित दारू विक्रीच्या ठिकाणावरील दारूचे कॅन आणि इतर साहित्य आधीच हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महत्त्वाचे पुरावे नष्ट झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून तपासात अडथळे निर्माण झाल्याची चर्चा आहे.
धामणे आणि परिसरात सुरू असलेले गावठी दारूचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संशयित मृत्यूच्या या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत असून, पोलीस व महसूल प्रशासन या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
शवविच्छेदन प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह
मृत्यूचे नेमके कारण समोर यावे यासाठी बापू चव्हाण यांचा मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. मात्र, तेथे शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण न झाल्याची माहिती समोर आल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल वैद्यकीय चौकशी करून मृत्यूचे खरे कारण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.






