Khed Accident : पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Khed Accident : खेड तालुक्यातील वाकी भाम हद्दीत रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण अपघात; टेम्पो चालकाच्या हयगयीमुळे एकाचा बळी.

Khed Accident – महामार्गावर भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. २२ मार्च) रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास खेड तालुकयातील वाकी भाम या गावाच्या हद्दीत घडली. याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत साबळे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो (MH 14 HU 5942) वरील चालक राजन संजय जाधव (रा. राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत दुचाकीस्वाराच्या पत्नीने सोमवारी (दि. २३) याबाबत उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी,
त्यांचे पती हेमंत साबळे आणि ६ वर्षांचा मुलगा हिमांशू हे ॲक्टिव्हा दुचाकीवरून चाकणकडे येत होते. यावेळी तुळशी हॉटेलसमोर पुणे बाजूकडून येणाऱ्या टेम्पो चालकाने हयगयीने गाडी चालवून त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात हेमंत साबळे यांचा मृत्यू झाला असून फिर्यादी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर चाकण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.




