Chakan Murder Case : चाकण हादरलं! भरदुपारी तरुणाच्या छातीत खुपसला स्क्रूड्रायव्हर; जुन्या भांडणातून थरारक खून
Chakan Murder Case : जुण्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी तरुणाचा बळी; चाकणगाव हद्दीतील नेहरू चौकाजवळ शनिवारी दुपारी घडला थरार.

Chakan Murder Case – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या छातीत स्क्रूड्रायव्हरने मारून त्याचा खून केला. ही घटना चाकणगाव हद्दीत नेहरू चौकाजवळ शिवसेना कार्यालयामागील बोळात शनिवारी (दि. १४) दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रथमेश शशिकांत माने असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव संजय शिंदे (रा. माणिक चौक, श्रीराम सोसायटी, चाकण),
अनुज संदीप परदेशी (रा. माळ आळी, चाकण), मयूर तरडे (रा. शेवकरी वाड्याजवळ, महात्मा फुले चौक, चाकण) व एक अल्पवयीन मुलगा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शशिकांत दाजी माने (वय ४८, रा. कमल पार्क सोसायटी, निघोजे, ता. खेड) यांनी शनिवारी याबाबत चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान नेहरू चौक, चाकण येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी प्रथमेश माने याच्यावर स्क्रूड्रायव्हरसारख्या टोकदार हत्याराने छातीत वार केले व फरशीने डोक्यात मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी वैभव शिंदे याला पोसिलांनी अटक केली आहे. पुढील तपास चाकण उत्तर पोलीस करीत आहेत.





