Accident News : खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला! एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, सहा जण जखमी
Accident News : भीषण अपघातात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Accident News : राजस्थानातील खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाने घाला घातला आहे. राजस्थानातील सालासर रस्त्यावर भीषण अपघातात नागपूर येथील पारसे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांमध्ये आई, वडील आणि मुलगा यांचा समावेश आहे. तर या अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने नागपूरच्या कामठीमध्ये खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Monalisa Bhosale: ‘सहा महिन्यांचं प्रेम म्हणजे साठ वर्षांचं नातं’ : मोनालिसा-फरमान खानची प्रेमकहाणी चर्चेत
मिळालेल्या माहितीनुसार, खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना टवेरा गाडीला पिकअपने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती की या दुर्देवी घटनेत पारसे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही वाहनांचे देखील मोठं नुकसान झाले आहे
महादेव पारसे, त्यांची पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम अशी मृतांची नावे आहेत. तर इतर सहा जखमींमध्ये आराधना पारसे, पायल पारसे , पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे यांचा समावेश आहे. या सर्वांवर सालासर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच कामठीतील कचरीपुरा परिसरात शोककळा पसरली आहे. तर मृतदेह शवविच्छेदनानंतर कामठी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती आहे.





