भीषण अपघात..! भरधाव कार थेट हॉटेलमध्ये घुसली; दोघांचा जागीच मृत्यू
Accident News : उमरगा बायपासवर तुळजापूरहून परतणाऱ्या कारने चहाच्या हॉटेलला धडक दिली, ज्यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Accident News : उमरगा शहरातील बायपास रस्त्यावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणारी कार रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या चहाच्या हॉटेलमध्ये घुसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील प्रवासी तुळजापूर येथे देवीचे दर्शन करून हैद्राबादकडे परत जात होते. दरम्यान उमरगा बायपास परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगत असलेल्या चहाच्या हॉटेलमध्ये घुसली. त्या वेळी हॉटेलमध्ये चहा घेत बसलेल्या दोन जणांना कारची जोरदार धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आणि जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आणि मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे उमरगा परिसरात शोककळा पसरली आहे.
पुणे-नगर रस्त्यावरही भीषण अपघात
दरम्यान, शिक्रापूर येथील पुणे अहमदनगर रोडवरही भीषण अपघात झाला. या अपघातात ४४ वर्षीय महेश भगत यांचा मृत्यू झाला. रात्री दोनच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या १७ आसनी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालक काही अंतर रस्त्यावर फरफटत गेला. ही संपूर्ण घटना परिसरातील निरीक्षण कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

