TOP 10 News : 1. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. तर राहुरीच्या जागेवर शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणूक रिंगणात आहेत. यानिमित्त सकाळीच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथील अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. mumbai pune express way 2. थांबा! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? जर तुम्ही मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणार असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एक्स्प्रेसवेवरील पुलाचे काम आणि शटरींग काढण्यासाठी २३ आणि २४ एप्रिल रोजी दुपारी 3 तासांचा ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या काळात दोन्ही दिशेकडील वाहतूक ठराविक वेळेत बंद ठेवून ती पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आज, २३ एप्रिल रोजी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी १२:०० ते ३:०० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या वेळेत मुंबईकडे जाणारी सर्व वाहने किवळे देहूरोड, तळेगाव आणि राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे कुसगाव टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेला वळविण्यात येतील. तर उद्या, शुक्रवारी पुणे वाहिनीवरील पुलाचे शटरींग काढण्याचे काम केले जाणार असल्याने या मार्गिकेवरही तीन तासांचा ब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान, पुणे वाहिनीवरील वाहतूकही राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून वळवण्यात येईल. 3. चिंताजनक! लग्न होत नसल्याने दोन तरुणांनी संपवले जीवन सध्या समाजात तरुणांच्या लग्नाचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत आहे. स्थळ मिळत नसल्याने वाढणाऱ्या नैराश्यातून तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. नुकतीच बुलढाणा जिल्ह्यात पाच दिवसांत दोन तरुणांनी लग्नाअभावी आपली जीवनयात्रा संपवली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पहिली घटना चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे घडली, जिथे सत्यपाल भिसे या सुशिक्षित तरुणाने नोकरी मिळत नसल्याने आणि लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून शेतात गळफास घेतला. तर दुसरी घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील आहे. हरीश वानखडे या २८ वर्षीय तरुणाने घरची गरिबी आणि सतत मिळणाऱ्या नकारांमुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्षण असूनही नोकरी नसणे, शेतीची दुरवस्था किंवा घरची हलाखीची परिस्थिती ही लग्नासाठी मोठी अडथळे ठरत आहेत. मित्रांची लग्ने होणे आणि स्वतःचे स्थळ न जमणे या सामाजिक दबावामुळे तरुणांमध्ये विमनस्कता वाढत आहे. या घटनांमुळे सामाजिक मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 4. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये मतदानासाठी मोठा बंदोबस्त तैनात आज पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ जागांवर मतदान होत आहे. यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली असून राज्यात सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १,४७८ उमेदवार रिंगणात आहेत. पश्चिम बंगालमधील १६ जिल्ह्यांतील या १५२ जागांसाठी ४४,३७६ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. दुसरीकडे, तामिळनाडूमध्येही आज सर्व २३४ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. तामिळनाडूमध्ये यावेळी ४,०२३ उमेदवार आपले नशीब अजमावत असून, ५.७३ कोटी मतदार त्यांच्या मताधिकाराचा वापर करतील. राज्यात एकूण ७५,०३२ मतदान केंद्रे बनवण्यात आली असून, त्यापैकी ५,९३८ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाली असून मतदार आपला हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांतील निवडणूक प्रक्रियेवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 5. राज्यात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचं ऊन पडत आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अजूनही कडाक्याचं ऊन पडत आहे. पण हे ऊन कमी होऊन अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गाारपीटची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढच्या चार दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तापमानाचा पारा हा 40 वर गेला होता. पण काल अचानक तापमानात बदल झाला आणि अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस पडला. पुण्यात पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6. मोदींना ‘दहशतवादी’ म्हंटल्याने खर्गे अडचणीत; निवडणूक आयोगाची कारवाई काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी चेन्नई येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा केला होता. मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या या आक्षेपार्ह विधानानंतर भाजप आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने बुधवारी (२२ एप्रिल २०२६) त्यांना नोटीस बजावली असून, २४ तासांच्या आत स्पष्टीकरण मागवले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. काँग्रेस अध्यक्षांच्या वादग्रस्त विधानावर कडक कारवाई करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली होती. यानंतर आयोगाने हे पाऊल उचलले आहे. आता खर्गे निवडणूक आयोगाला काय उत्तर देणार, हे पाहावे लागेल. 7. तृणमूल आणि भाजपच्या संघर्षात माशांचा मुद्दा बनला महत्त्वाचा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत आता ‘मासे आणि भात’ या बंगाली अस्मितेच्या विषयाने प्रवेश केला आहे. तृणमूल आणि भाजपच्या संघर्षात माशांचा मुद्दा महत्त्वाचा बनला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये यावरून जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला असून, दोन्ही पक्षांचे नेते मासे खातानाचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे की, भाजप सत्तेत आल्यास बंगालमध्ये मासे, मांस आणि अंडी खाण्यावर बंदी येईल. भाजपला ‘शाकाहारी आणि हिंदी लादणारा पक्ष’ ठरवून बंगाली संस्कृतीला धोका असल्याचा प्रचार तृणमूल करत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या नेत्यांनी ‘आम्ही बंगाली खाद्यसंस्कृतीचा सन्मान करतो’ हे दाखवण्यासाठी माशांवर ताव मारण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे मासे खातानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. यावरून आम आदमी पक्षाने भाजपवर दुटप्पीपणाची टीका केली आहे. सत्तेसाठी आपला मूळ स्वभाव विसरून भाजप नेते वार-वेळेचे बंधन न पाळता मासे खात असल्याचे चित्र बंगालमध्ये दिसत आहे. थोडक्यात, बंगालच्या निवडणुकीत आता विकासापेक्षा खाद्यसंस्कृतीचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. TOP 10 News Donald trump 8. युद्धविरामाची मुदत वाढ! अमेरिकेसमोर इराणने ठेवली अट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची मुदत वाढविल्याची घोषणा केली. मात्र इराणने आपले आक्रमक धोरण कायम ठेवत होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन जहाजांवर गोळीबार केला. त्यातील दोन जहाजे जप्त केली असून, त्यातील जहाज भारताकडे येणार होते. सागरी हद्दीविषयक नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच या जहाजांवर कारवाई करण्यात आल्याचे समर्थन इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्डने केले आहे. या घटनांमुळे युद्धातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी बसण्यापूर्वी अमेरिकेने नौदल नाकेबंदी उठवावी, जोपर्यंत नाकेबंदी सुरू आहे, तोपर्यंत युद्धविरामाला काहीही अर्थ नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे कायमस्वरूपी प्रतिनिधी अमीर सईद इरावानी यांनी, नाकेबंदी हटविल्यानंतरच अमेरिकेसोबत चर्चा होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. 9. लखनौचा सलग चौथा पराभव! आयपीएल २०२६ च्या हंगामात लखनौ सुपरजायंट्सचा खराब फॉर्म कायम असून राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. अवघ्या १६० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना लखनौची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि राजस्थानने ४० धावांनी दिमाखात हंगामातील पाचवा विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. रवींद्र जडेजाने २९ चेंडूंत नाबाद ४३ धावांची खेळी करून राजस्थानला २० षटकांत १५९ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात १६० धावांचे आव्हान लखनौसाठी सोपे वाटत होते, पण जोफ्रा आर्चरने आपल्या ४ षटकांत केवळ २० धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले. सलामीवीर मिचेल मार्शने ५५ धावांची झुंझाऊ खेळी केली, निकोलस पूरनने २२ धावा केल्या, मात्र १८ षटकांत केवळ ११९ धावांवर लखनऊचा डाव आटोपला. Payal Kapadia: पायल कपाडिया यांची कानमध्ये ऐतिहासिक झेप; मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी 10. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चित्रपटाची घोषणा ‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या तीनही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आता चाहते चौथ्या सीझनची वाट पाहत असतानाच निर्मात्यांनी ‘मिर्झापूर: द मूवी’ची घोषणा करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. TOP 10 News या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण दिव्येंदू शर्मा म्हणजेच ‘मुन्ना भैया’चे पुनरागमन असणार आहे. वेब सीरिजमध्ये मुन्ना भैयाची एक्झिट झाली असली, तरी चित्रपटात तो पुन्हा एकदा स्वॅगमध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत पंकज त्रिपाठी (कालीन भैया) आणि अली फजल (गुड्डू पंडित) हे दिग्गज कलाकार पाहायला मिळतील. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. ‘मिर्झापूर: द मूवी’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हेही वाचा: Pune Rain : पुणेकरांना सुखद धक्का! ४२ अंशाच्या चटक्यानंतर गारांचा वर्षाव; रस्त्यांवर साचले गारांचे खच