प्रभात वृत्तसेवा पुणे – खराडीतील पार्टी प्रकरणातील आरोपी डाॅ. प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांचा सोमवारी गुन्हे शाखेने जबाब नोंदविला. यावेळी त्यांची चौकशीही केली.यावेळी ॲड. पुष्कर दुर्गे उपस्थित होते. यापूर्वी रोहिणी खडसे यांचा जबाब नोंदविण्यात आला नव्हता. पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांनी त्यांचा जबाब नोंदविला, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी सांगितले.एका पार्टीवर गुन्हे शाखेने २५ जुलै रोजी मध्यरात्री छापा टाकला. कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डाॅ. प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद. सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, इशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २ ग्रॅम ७० मिलीग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, हुक्का पात्र, दहा मोबाइल संच, सुगंधी तंबाखू, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला होता.खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर रक्ताचे नमुने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. प्रयोगशाळेने खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.