Shirur Panchayat Samiti : पवार की घावटे? शिरूरमध्ये सभापती पदासाठी चुरसीची लढत; पाहा कोणाचे पारडे जड
Shirur Panchayat Samiti : उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार निवडणूक प्रक्रिया; तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांची दिशा स्पष्ट होणार.

Shirur Panchayat Samiti – शिरूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज (दि. ९) शिरूर पंचायत समितीच्या विशेष सभेत पार पडणार असून निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या पदांवर कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिरूर पंचायत समितीचे सभापती पद हे ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव असल्याने काही महिला सदस्यांची नावे चर्चेत आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून माजी बाजार समिती सभापती प्रकाश पवार यांच्या पत्नी वंदना पवार तसेच माजी सरपंच विठ्ठल घावटे यांच्या पत्नी स्वाती घावटे या सभापती पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत.
त्यामुळे या दोघींमध्ये चुरस रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपसभापती पदासाठी रामराव सासवडे, दीपक पवार, विजय रणसिंग आणि विकास शेलार यांची नावे राजकीय चर्चेत असल्याचे समजते. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी व स्थानिक नेत्यांच्या चर्चेनंतर होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांमध्ये हालचाली वाढल्या आहेत.
दरम्यान, पंचायत समितीची ही निवडणूक शिरूर .पंचायत समिती कार्यालयातील छत्रपती संभाजी सभागृहात होणार असून गटविकास अधिकारी सचिव म्हणून काम पाहणार आहेत. निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर आता सभापती-उपसभापती पदांच्या निवडीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार आहेत. विशेषतः स्थानिक नेते व पक्षांमध्ये अंतर्गत चर्चेला वेग आला असून अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडीमुळे पंचायत समितीच्या पुढील कारभाराची दिशा ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.





