Khalapur News – सध्या युद्धामुळे आखाती देशांमधून होणाऱ्या गॅसचा पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. नागरिकांना अन्न शिजविण्यासाठी गॅसची कमतरता भासू नये, याकरिता व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. परंतु काही ठिकाणी हाॅटेल्स आणि रिसाॅर्ट चालकांकडून घरगुती सिलिंडरचा वापर करुन व्यवसाय केला जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. तहसीलदार कार्यालयाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा शाखा विभाग यांच्या माध्यमातून खालापुरात टुथ माउंटन रिसॉर्टमध्ये केलेल्या तपासणीत सात घरगुती गॅस सिलिंडर आढळून आले. हे सिलिंडर जप्त करत रिसॉर्टवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील सर्वच हॉटेल्स, ढाबा, स्नॅक्स सेंटर व उद्योगधंद्याकरिता होणारा वापर इत्यादी बाबत तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार तपासणीवेळी अवैधरित्या घरगुती सिलिंडरचा वापर केल्याचे निर्दशनास आल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. 16 मार्च 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गाव हातनोली ता.खालापूर येथील टुथ माउंटन रिसॉर्ट येथे पुरवठा विभाग, तहसील कार्यालय खालापूर विभागाकडून कारवाई करण्यात आली. स्थळ तपासणीदरम्यान एकूण 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. त्यापैकी 2 सिलेंडर भरलेल्या स्थितीत असल्याचे निर्दशनास आले. सदर सिलेंडर जप्त करण्यात करण्यात आले आहे. “खालापूर तहसिल प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, घरगुती गॅस सिलेंडर अनाधिकृत साठा, विक्री किंवा व्यावसायिक वापर आढळल्यास महसूल प्रशासनास माहिती कळवावी. तसेच कोणत्याही गॅस कमतरतेबाबतच्या आफवांना बळी पडू नये.” – अभय चव्हाण – तहसीलदार, खालापूर