Khalapur News: चौक-कर्जत मार्गावरील अतिक्रमणांवर हातोडा! प्रशासनाकडून जेसीबीच्या साहाय्याने कारवाई
Khalapur News: महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची पोलीस बंदोबस्तात मोठी कारवाई; अनधिकृत टपऱ्या आणि दुकाने जेसीबीने हटवली.

Khalapur News – परिसरातील चौक ते कर्जत मार्गालगत झालेल्या अतिक्रमणांवर सोमवारी (दि. ३१) प्रशासनाने धडक कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगतच्या अनधिकृत टपऱ्या, दुकाने आणि बांधकामे हटविण्यात आली. अतिक्रमणामुळे अरुंद झालेला मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र, कारवाईमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली असून काही दुकानदारांनी कारवाईवर आक्षेप घेतला. चौक-कर्जत मार्ग हा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही या मार्गाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला झालेल्या अनधिकृत टपऱ्या आणि बांधकामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच अपघातांचे प्रमाण वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याचे आवाहन केले होते.
त्यामुळे काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे हटविली. मात्र, अनेक ठिकाणी अतिक्रमणे कायम राहिल्याने प्रशासनाने ही कारवाई केली. ग्रामपंचायत चौक आणि ग्रुप ग्रामपंचायत वावरे यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने पोलीस बंदोबस्तात मोहीम राबविण्यात आली. मात्र काही स्थानिक दुकानदारांनी कारवाईवर आक्षेप घेतला.
कारवाईमागे राजकीय वरदहस्त असल्याचा आरोपही काही व्यावसायिकांनी केला. त्यामुळे काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. अतिक्रमण हटवल्याने चौक-कर्जत मार्ग मोकळा झाला आहे. वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज स्पष्टपणे येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार करण्यात आली असल्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.





