Chakan Traffic: चाकणच्या वाहतूक कोंडीवर प्रशासनाचा ‘फुल ॲक्शन प्लॅन’; २५ ऑगस्टपासून अतिक्रमणांवर कारवाई
Chakan Traffic: ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त रस्ते; शुक्रवारपासून रस्त्यावरील पार्किंग बंद

पिंपरी – चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडीवर आता प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. खड्डे, अवैध पार्किंग, अतिक्रमणे आणि रस्त्यात बंद पडणारी अवजड वाहने यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
या सर्व समस्यांवर एकाचवेळी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुदत पाळली नाही तर संबंधित अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. शुक्रवारपासून एमआयडीसीतील रस्त्यांवर पार्किंगलाही पूर्णपणे बंदी राहणार आहे.
शैक्षणिक : शिक्षकांच्या सुट्ट्या?
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली. यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यावेळी उपस्थित होते.
दररोज चार तास कोंडीत
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून मोठ्या संख्येने कामगार चाकण एमआयडीसीत ये-जा करतात. सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होते. अनेकांना दररोज तब्बल चार तास कोंडीत अडकून राहावे लागते. खड्डे, खराब साइडपट्ट्या, रस्त्यावरील पार्किंग आणि अतिक्रमणे ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विविध विभागांची समन्वय समिती कार्यरत करण्यात आली आहे.
रस्त्यावर पार्किंग केल्यास वाहन जप्त
एमआयडीसीतील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्त्याच्या एक ते दोन लेन वाहनांच्या पार्किंगमध्ये अडकतात. आता ही परिस्थिती बदलण्यासाठी रस्त्यावरील पार्किंगला पूर्ण बंदी घालण्यात येणार आहे. एमआयडीसीतील मोकळ्या भूखंडांवर अधिकृत पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल.
रस्त्यावर वाहन उभे आढळल्यास ते थेट जप्त केले जाणार आहे. जप्त वाहनांसाठी स्वतंत्र जागाही निश्चित करण्यात आली आहे. पार्किंग हटवल्यानंतर वाहतुकीचा वेग २५ ते ३० टक्क्यांनी वाढेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
१०० एमएसएफ जवानांचा बंदोबस्त
चाकण परिसरातील वाढती वाहनसंख्या पाहता वाहतूक पोलिसांवर मोठा ताण आहे. त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान आठवडाभरात तैनात केले जाणार आहेत. दोन शिफ्टमध्ये हे जवान काम करतील. वाहतूक कोंडीच्या प्रमुख ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाईल.
रस्त्यात वाहन बंद पडल्यास कारवाई
डिझेल संपल्यामुळे अनेक अवजड वाहने रस्त्यातच बंद पडतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणखी वाढते. यापुढे इंधन संपणे किंवा चालकाच्या निष्काळजीपणामुळे वाहन रस्त्यात बंद पडल्यास कारवाई केली जाणार आहे. बंद पडलेली वाहने तातडीने बाजूला करण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेन उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.
२५ ऑगस्टपासून अतिक्रमण हटाव
रस्त्यालगतच्या टपऱ्या, अनधिकृत शेड आणि बेकायदेशीर गोदामांची यादी तयार करण्यात आली आहे. संबंधितांना सात दिवसांची नोटीस दिली जात आहे. २५ ऑगस्टपासून अतिक्रमणांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू होईल. अतिक्रमण हटवल्यानंतर संबंधित जागा पुन्हा बळकावली जाऊ नये, यासाठी तेथे तातडीने रस्ता विकसित केला जाणार आहे.
१९ किलोमीटरचा पट्टा केंद्रस्थानी
पहिल्या टप्प्यात कोंडीची सर्वाधिक समस्या असलेल्या १९ किलोमीटरच्या रस्त्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. विविध विभागांची यंत्रणा एकत्रितपणे काम करणार आहे. संपूर्ण एमआयडीसी परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रणेद्वारे पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयातून वाहतुकीवर चोवीस तास नजर ठेवली जाणार आहे.
‘चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी लागतील. एक दिवसाचाही विलंब झाल्यास संबंधित यंत्रणा, अभियंते आणि कंत्राटदारांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई केली जाईल. रस्त्यावरील पार्किंगबाबतही ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्यात येणार आहे.’- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी






