Pune News : विद्यार्थ्यांनी घेतला ‘रस्ता सुरक्षा ऑडिटर’ होण्याचा धडा; सरिता विद्यालय व सुंदराबाई राठी हायस्कूलमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान
रस्त्यावर रुग्णवाहिकेला प्रथम प्राधान्य द्यावे, ‘गिव्ह वे टू ॲम्ब्युलन्स’, ‘नो हॉर्न ओके प्लीज’, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, ‘वॉक ऑन राईट’ यांसह विविध सुरक्षित वाहतुकीच्या नियमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

Pune News : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियम आणि सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्वती येथील मित्र मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या सरिता विद्यालय आणि सुंदराबाई राठी हायस्कूल येथे ‘सेफ मोबिलिटी’, ‘मोबिलिटी स्नॅपशॉट बाय चिल्ड्रन अँड यंग अडल्ट्स’ तसेच ‘डेंजरस स्पॉट मॉड्युल’ अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या अभियानात विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच रस्ता सुरक्षा, सुरक्षित हालचाल, वाहतुकीचे कायदे व विविध कलमे, वाहतूक चिन्हे आणि मोटार वाहन कायद्यातील विविध तरतुदी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रस्त्यावर रुग्णवाहिकेला प्रथम प्राधान्य द्यावे, ‘गिव्ह वे टू ॲम्ब्युलन्स’, ‘नो हॉर्न ओके प्लीज’, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, ‘वॉक ऑन राईट’ यांसह विविध सुरक्षित वाहतुकीच्या नियमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांना ‘डेंजरस स्पॉट’चे प्रत्यक्ष ऑडिट :
भविष्यातील रस्ता सुरक्षा ऑडिटर घडविण्याच्या उद्देशाने मित्र मंडळ चौक परिसरात विद्यार्थ्यांना सहभागी करून ‘एव्हिडन्स बेस्ड ऑडिट’ कशा पद्धतीने करावे, धोकादायक ठिकाणे कशी ओळखावीत आणि त्यासाठी कोणत्या पद्धती व निकषांचा वापर करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन सेफ इंडिया फॉर एव्हरीवन, ओरिसाचे संचालक व रस्ता सुरक्षा ऑडिटर दिलीप कुमार पांडा, पुणे शहर वाहतूक शाखा आणि ऑटो लिव्ह कंपनी यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमास मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष राजू घाटोळे, सल्लागार संतोष कपटकर, प्रोग्राम कोऑर्डिनेटर तथा स्वयंम सेवाभावी संस्थेच्या सातारा संचालिका शितल विधाटे, पुणे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, कार्यकारी संचालक मनोज विधाटे, शारदा शिंदे, स्वाती फडके उपस्थित होते.
यावेळी हायस्कूल विभागाच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री सुपनेकर, सरिता प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली नेरळ, नेहा गोरे, सुप्रिया माने, समीर शिराळकर, नीताली हरगुडे, मनूजया शिंदे, दिव्या शिंदे तसेच इतर शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश यांनी केले. आभार प्रदर्शन व अभिप्राय नीताली हरगुडे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रस्ता सुरक्षेचा संदेश दिला.





