पुणे – खडकवासला मतदारसंघात मतदानासाठी सकाळी ७ वाजेपासून सकाळपासूनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. मात्र, यादीतून नावे गायब आणि बोगस मतदानाच्या तक्रारी करण्यात आल्या. यामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. तर, मृत व्यक्तींची नावे मतदारयादीत असल्याच्या तक्रारी मांडण्यात येत होत्या. खडकवासला मतदारसंघात धनकवडी, नऱ्हे, वडगाव, धायरी, नांदेड परिसरात मतदारांसाठी सुविधा केंद्र, तंत्रज्ञानाचा वापर, योग्य नियोजनामुळे मतदान प्रक्रियेला गती दिसून आली. सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक, माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर निघालेले नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी हजर झाले. तसेच नवमतदारांचा उत्साह दिसून येत होता. मात्र, अनेक ठिकाणी लोकसभेला मतदान केले, मात्र विधानसभेला मतदार यादीत नावच नाही असे प्रकार घडल्याचे दिसून आले. अनेकांना मतदान न करताच परतावे लागले. तर काही नवमतदारांची यादीत नावे नव्हते. त्यामुळे त्यांचाही निरुत्साह झाला. माझं मतदान चोरीला गेलं… संभाजी ब्रिगेडचे प्रवेश प्रकक्ता संतोष शिंदे हे सपत्नीक मतदानाला आले होते. धनकवडीतील प्रियदर्शनी विद्यामंदिर व प्राथमिक विद्यालयात ते मतदानासाठी आले. पण, त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे सांगण्यात आले. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी “मतदान करुन गेलेला माणूस तुमच्यासारखाच आणि आमच्या यादीतील तुमच्या छायाचित्रासारखाच दिसत होता,’ असे सांगितले. यामुळे शिंदे यांचा पार चढला. याबाबत दैनिक “प्रभात’शी बोलताना त्यांनी सांगितले की, “माझ्या मताची चोरी झालेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यामुळे बोगस मतदान झाल्याचे निदर्शनास येत आहे.’ २० वर्षांपासून मतदान, तरीही नाव गायब कांतिलाल अनंत बडधे (५९, रा. धनकवडी) यांनी सांगितले की, “मागील २० वर्षे आम्ही मतदान करत आहोत. मात्र, यावेळी मतदार यादीत नाव नसल्याने माझ्यासह अनेकांना परत जावे लागले आहे. मतदार याद्या अद्ययावत केल्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात नाव गायब झाल्याचे दिसते.’ मृत व्यक्तीचे नाव यादीत अनिल पायगुडे यांच्या वडिलांचे पंधरा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे अनिल यांनी वडिलांचे नाव मतदार यादीतून त्यांचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केला. तरीही, दरवेळी त्यांचे नाव मदारयादीत येते आणि व्होटर स्लिपही येते. मात्र, यावेळी स्वत: अनिल यांचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. वेळ आणि मतदानाची टक्केवारी स.७ ते ९ ५.४४ स.९ ते ११ १७.०५ स.११ ते १ २९.०५ दु.१ ते ३ ४०.०४ दु. ३ ते ५ ५१.५६ सायं ६ – ५६.५३