Koyna Dam : कोयना धरणात 92 टीएमसी पाणीसाठा; पालकमंत्र्यांकडून पाहणी
संततधार पावसामुळे कोयना धरणातील (Koyna Dam) पाणीसाठा झपाट्याने वाढत असून सध्या धरणात ९२ टीएमसी पाणीसाठा नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना धरणाची पाहणी केली.

Koyna Dam : संततधार पावसामुळे कोयना धरणातील (Koyna Dam) पाणीसाठा झपाट्याने वाढत असून सध्या धरणात ९२ टीएमसी पाणीसाठा नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना धरणाची पाहणी केली. परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. त्यांनी धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून पाण्याची आवक, साठा आणि विसर्ग याबाबत तपशीलवार माहिती जाणून घेतली.
पालकमंत्री देसाई म्हणाले, “कोयना (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढत आहे. सध्या ९२ टीएमसी साठा असून, येत्या काही दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर पारंपरिक पाणीपूजन सोहळा पार पडेल.”
धरण व्यवस्थापनाने पाणीसाठ्याचे नियोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले असल्याचे त्यांनी समाधानाने नमूद केले. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विसर्गाचे नियोजन व नियंत्रण प्रभावीपणे केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोयना नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या आहेत. स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी नागरिकांना आवश्यक ती मदत करत असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोयना धरणातील (Koyna Dam) वाढता पाणीसाठा राज्याच्या जलसंपत्ती व वीज निर्मितीसाठी दिलासादायक ठरत असला, तरी येणारे काही दिवस परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
या पाहणीवेळी कोयना धरण व्यवस्थापनाचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार व स्थानिक पदाधिकारी व संबंधित विभागांचे मान्यवर उपस्थित होते.





