केंद्रातील मंत्रीपदावरुन खदखद ! शिंदे गटाच्या नेत्याने बोलून दाखवली नाराजी, काय म्हणाले? पाहा….

PM Modi New Cabinet । Shrirang Barne : सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून रविवारी शपथ घेतली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन त्यांनी देशात नवीन इतिहास निर्माण केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 72 मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एनडीएच्या 9 पक्षांच्या 11 खासदारांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्व मित्रपक्षांना खूश करण्याचा प्रयत्न केला असला तरी, तरीही काही पक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. कारण एनडीएच्या 14 मित्रपक्षांकडे 53 जागा आहेत, परंतु सध्या 9 पक्षांचे केवळ 11 नेते मंत्री झाले आहेत, तर 5 पक्षांच्या नेत्यांना मोदी 3.0 मध्ये स्थान मिळालेले नाही.
यावरून आता घटक पक्षांमध्ये मंत्रिपदावरुन नाराजी कायम असल्याच चित्र आहे. सात खासदार असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटातील खासदाराने मनातील नाराजी बोलून दाखवली. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, ‘एनडीए मधील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असं होतं तर मग कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांना ही एक मंत्री पद द्यायला हवं होतं. तसेच भाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंना ही मंत्री पद द्यायला हवं होतं” असं म्हणत बारणेंनी सगळी खदखद बोलून दाखवली.





