Ketan Agarwal Murder: प्रियकरासोबत मिळून केली मर्डरची ‘रंगीत तालीम’; केतन अगरवाल खून प्रकरणी धक्कादायक खुलासा
Ketan Agarwal Murder: गुगल-युट्यूबवर विष देणे आणि अपघातांचे मार्ग शोधले; केतन ट्रेकर असल्याने अखेर लोहगडाची दरी निवडल्याचे तपासात निष्पन्न.

Ketan Agarwal Murder – केतन अगरवाल हत्याकांडाच्या तपासातून दररोज धक्कादायक माहिती समोर येत असून, हा खून अत्यंत थंड डोक्याने आणि पूर्वनियोजित पद्धतीने केला आहे. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनचा खून करण्यापूर्वी त्याची रंगीत तालीम केली होती. हत्या कशा पद्धतीने करायची याचा गुगल, युट्यूबवर शोध घेतल्यानंतर अखेर लोहगडावरून दरीत ढकलून देण्याचा कट आखल्याचे समोर आले आहे.
सिया आणि चेतनची ओळख दिवाळीतील एका कार्यक्रमात झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. याच काळात सियाचा साखरपुडा केतनशी झाला. लग्न ठरल्यानंतर काही काळ दोघांमध्ये अंतर आले. नंतर पुन्हा संपर्क वाढल्यानंतर केतन हा आपल्या नात्यातील अडथळा असल्याची भावना निर्माण झाली.केतनला मार्गातून दूर करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला.
विष देणे, अपघात घडवणे किंवा कायमचे अपंग करणे अशा मार्गांची माहिती त्यांनी इंटरनेटवर शोधली. केतनला ट्रेकिंगची आवड असल्याने आणि तो गडकिल्ल्यांवर नियमित जात असल्याचे लक्षात घेऊन लोहगड हा खून करण्यासाठी सोपा पर्याय असल्याचे त्यांनी ठरविले. ३१ मे रोजी सिया केतनसोबत लोहगडावर गेली होती. त्यावेळी पाहणी केल्यावर तेथे केतनला मार्गातून दूर करणे शक्य असल्याची खात्री सियाला वाटली.
त्यानंतर दोघांनी चार-पाच दिवस आधी एका ठिकाणी भेटून कटाची रंगीत तालीम केली. केतन कुठे उभा राहील, सिया कोणत्या ठिकाणी असेल आणि चेतन कोणत्या दिशेने येऊन धक्का देईल, याचा सरावही केला. १४ जून रोजी सियाने एकटीने केतनला लोहगडावर नेऊन दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, केतनने स्वतःला सावरल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला. संशय येऊ नये म्हणून सियाने साप… साप… असा आरडाओरडा करून प्रसंग झाकण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर एकटीला हे शक्य नसल्याचे तिने चेतनला सांगितले. त्यावर चेतनने हत्येची जबाबदारी स्वीकारली. अखेर १८ जून रोजी सकाळी लोहगडावरील हत्ती तलाव परिसरातील दरीत केतनला ढकलून त्याचा खून केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या मृत्यूमागे पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी दोघेही अटकेनंतर सध्या पोलिस कोठडीत आहेत.






