समाविष्ट गावांतील खड्डे बुजविण्यात आल्याचा पुणे महापालिकेचा दावा फोल

मांजरी – महापालिकेने शहरातील तसेच समाविष्ठ गावांतील ९० टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने सात दिवसांपूर्वी केला होता. मात्र, समाविष्ट गावांतील खड्डे तसेच आढळल्याने ९० टक्के खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा फोल ठरल्याची चर्चा या समाविष्ट गावांत रंगली आहे.
पहिल्या पावसातच प्रमुख रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत संपूर्ण शहर व उपनगर खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. पथ विभागातील सर्व अभियंते दिवस-रात्र दुरुस्तीचे काम करीत आहेत. पथ विभागामार्फत तीन भरारी पथके नेमण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांत शहरातील व उपनगरातील तसेच समाविष्ट गावांतील ९० टक्के खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती महापालिकेतर्फे आयुक्तांच्या नावाने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली होती.
मात्र, यात समाविष्ट गावांतील खड्डे कधी आणि कोठे बुजविण्यात आले, हे मात्र अजूनही लक्षात येत नाही. कारणही तसेच आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या केशवनगर, साडेसतरानळी, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी या गावांतील रस्त्यावर पडलेले खड्डे जैसे थे आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने केलेला दावा या गावांसाठी फोल ठरत आहे.
मांजरी बुद्रुक येथील गोपाळपट्टी, दीपकनगर (चिलाई ) रस्ता तसेच, मांजरी ग्रीन ते मोरे वस्ती रस्ता, मांजरी बुद्रुक महापालिका संपर्क कार्यालय ते भापकर मळा रस्ता या सर्व रस्त्यांची पावसाळ्यात खड्डे पडून चाळण झाली आहे. अशीच काहीशी परिस्थिती साडेसतरा नळी व केशवनगर मधील अंतर्गत रस्त्यावर पहायला मिळत आहे. महापालिकेत ही गावे समाविष्ट झाल्यानंतर येथून कर संकलन सुरू आहे.
वाघोलीतील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर
त्यामुळे अत्यावश्यक असलेल्या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती ही महापालिका प्रशासनाने करावी, आता पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील खड्डे बुजविण्यात येत असतानाच समाविष्ट गावांतील खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, आमच्या गावच्या रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच आहेत त्यामुळे त्यांचा हा दावा फोल आहे, अशी चर्चा या गावांमध्ये सुरू आहे.
पुणे : हडपसरमध्ये स्ट्रीट लाईटच्या खांबावर लटकलेले फलक धोकादायक






