अनधिकृत फ्लेक्स हटवण्याची मागणी
हडपसर – महापालिका कार्यक्षेत्रात जाहिरात फलक,किंवा फ्लेक्स किंवा होर्डिंग्ज लावताना आकाशचिन्ह विभागाची परवानगी आवश्यक असते. मात्र, हडपसर येथील सध्याची परिस्थिती पहाता आकाशचिन्ह विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे पहायला मिळत आहे. हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या भागात सर्वाधिक अनाधिकृत फ्लेक्स लटकल्याचे चित्र दिसत आहे.
रामटेकडी उड्डाणपूल, मगरपट्टा चौक, हडपसर गाव, हडपसर उड्डाणपूल, गाडीतळ , रविदर्शन, आकाशवाणी, पंधरानंबर , लक्ष्मी कॉलनी, शेवाळेवाडी फाटा, मांजरी फार्म असा भागात स्ट्रीट लाईटच्या खांबावर हे अनधिकृत फ्लेक्स लटकताना दिसत आहेत. याशिवाय पदपथावर असलेल्या साईन बोर्ड, झाडांवर आणि सिग्नलच्या खांबावर सर्रासपणे जाहिरातीचे फलक लावलेले आहेत. बांधकाम व्यावसायिक, कोचिंग क्लासेस, हॉटेल, खासगी शाळा, पीजी, बंगले, फ्लॅट,अशा अनेक जाहिराती खांबावर झळकत आहे.
सध्या विशेष म्हणजे एका बांधकाम व्यावसायिकाने महापालिका प्रशासनाचे हातच पोहचणार नाहीत इतक्या उंचीवर स्ट्रीट लाईटच्या खांबांना रस्त्याच्या मधोमध हे फ्लेक्स लटकलेले दिसत आहेत. लटकलेले हे फलक वारा व पावसात अचानक तुटून पडले जात आहेत. अनेकदा मोठ्या वाहनांना हे फ्लेक्स लागून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिका प्रशासनाचे सर्व नियम पायदळी तुडवत बिनधास्तपणे हे फ्लेक्स लटकलेले असतात, अशा या फुकट्या जाहिरातदारांचे फलकावर नाव नंबर असुन ही पालिकेचे अधिकारी जाणुन बुजून दुर्लक्ष करीत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील ,तसेच मगरपट्टा चौक ते मुंढवा चौक दरम्यान विजेच्या खांबावरील जाहिराती फलक लवकरात लवकर काढण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केलीआहे.दरम्यान वारंवार कारवाई करण्यात येत असल्याचे या विभागाकडून सांगण्यात येते.
गुन्हे दाखल केले जाणार- प्रसाद काटकर
हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विनापरवाना लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.
प्रसाद काटकर ,सहाय्यक आयुक्त, हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालय.