केजरीवाल इंडियाच्या बैठकीला राहणार उपस्थित

नवी दिल्ली -दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीच्या (इंडिया) बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या सहभागीविषयीचा सस्पेन्स तूर्त तरी संपला आहे. इंडियाचे घटक बनल्यानंतरही आप आणि कॉंग्रेस या पक्षांत सातत्याने तणाव निर्माण होत असल्याचे दिसत आहे.
त्यातून इंडियाच्या पुढील बैठकीत सहभागी व्हायचे की नाही या निर्णय पक्षनेतृत्व घेईल, असे सूतोवाच नुकतेच आपने केले. त्यानंतर छत्तिसगढवरून त्या दोन्ही पक्षांत जुंपली. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या छत्तिसगढमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आप सरसावला आहे.
त्या राज्याचा दौरा करून केजरीवाल यांनी तेथील सरकारी शाळांची स्थिती भयानक असल्याची टिप्पणी केली. ती अर्थातच न रूचल्याने कॉंग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली. त्यामुळे आप आणि कॉंग्रेसची मनं अद्यापही जुळली नसल्याचेच चित्र समोर आले.
त्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील एका कार्यक्रमावेळी पत्रकारांनी केजरीवाल यांना इंडियाच्या बैठकीला उपस्थित राहणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. इंडियाची तिसरी बैठक चालू महिन्याच्या अखेरीस मुंबईत होणार आहे. त्या बैठकीच्या अजेंड्यावर घटक पक्षांमधील मतभेद दूर करण्याचा विषयही असल्याचे समजते.





