सरकारच्या धोरणाशी ‘ताळमेळ’ ठेवा; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची उद्योगजगताला सूचना

नवी दिल्ली – खासगी उद्योग व्यवसायिक पद्धतीने काम करीत असतात. मात्र बदललेल्या परिस्थितीनुसार भारतीय उद्योगांनी देशाची अर्थव्यवस्था, देशाचे प्राधान्यक्रम आणि दीर्घ पल्ल्याच्या गरजा ओळखून काम करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केले आहे.
भारतीय उद्योग महासंघाच्या जागतिक आर्थिक धोरण मंच या कार्यक्रमात बोलताना सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या घडामोडी जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर घडल्या त्यानुसार आता उद्योगांनी आपल्या धोरणात काही प्रमाणात फेररचना करण्याची गरज निर्माण झाली आहे. भारतीय उद्योगांनी अशा प्रकारची पुरवठा साखळी निर्माण करावी की, त्यामुळे जागतिक पेचप्रसंगाचा या पुरवठा साखळीवर परिणाम होणार नाही.
आगामी दशकातील अर्थव्यवस्थेच्या प्राधान्यक्रमाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मोठ्या उद्योगांनी छोट्या उद्योगाबरोबर सहकार्य करावे. छोट्या उद्योगांचा आपल्याबरोबर कसा विकास होईल याकडे मोठ्या उद्योगांनी लक्ष द्यावे. पुरवठा साखळीत त्यांना समाविष्ट करून घ्यावे. त्यामुळे छोट्या उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होईल.
आपल्याला आपली पुरवठा साखळी स्वावलंबी भारतासाठी विकसित करावी लागेल. याकडे केवळ नफ्याच्या दृष्टिकोनातून न पाहता भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ स्वस्तात सुटे भाग मिळतात म्हणून पाहिजे तेथून घेण्याची पद्धत ठेवली तर जागतिक पातळीवर नकारात्मक घटना घडल्यानंतर या पुरवठा साखळीवर परिणाम होतो. ती पूर्ववत करणे आपल्या हातात राहत नाही. त्यासाठी या क्षेत्रात जास्तीत जास्त आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संघर्ष टाळण्याची गरज
गेल्या दशकात जगात अनेक देशांदरम्यान संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका जागतिक व्यापाराला बसत आहे. अशा परिस्थितीत जगातील प्रशासकांनी आणि उद्योगांनी जागतिक व्यापारावर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने काम करण्याचे आवाहन सितारामन यांनी केले. या संघर्षामुळे गेल्या दशकात महागाई कमी वाढली आहे तर विकासदरावर त्याचा परिणाम झाला आहे.





