पुणे जिल्हा | कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन रस्ता खड्ड्यांत

सोरतापवाडी, (वार्ताहर)- कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचनपर्यंत पुणे सोलापूर महामार्गाची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी महामार्गाला तळ्याचे स्वरूप आले आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पूर्णपणे या महामार्गाकडे दुर्लक्ष झाले असून त्या विरोधात येत्या 15 ऑगस्टला पुणे-सोलापूर महामार्गावर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचा इशारा सोरतापवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष कड यांनी दिला आहे.
कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी टोलनाका या रस्त्याची मुदत संपल्यावर टोलनाका बंद झाला. त्या वेळेपासून रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असुन पावसाळ्यात ठिकठिकाणी तळ्यां स्वरूप महामार्गावर येत आहे. याचा वाहन चालकांना व विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.
पूर्व हवेलीतील कदम वस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन हद्दीतून जाणार्या महामार्गाची अवस्था अतिशय खराब असून वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना सांगून सुद्धा त्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत. सोरतापवाडी हद्दीतील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाजवळ महामार्गावरती पावसाचे पाणी साठून तिथे तळ्याचे स्वरूप आले आहे.
त्यातून मार्ग काढताना विद्यार्थ्यांना कसरत करत सायकल चालवत मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे येथे 15 ऑगस्ट ला विद्यार्थ्यांना घेऊन पुणे -सोलापूर महामार्गावर भव्य अशा स्वरूपात वृक्षारोपण करण्यात येणार असून अधिकार्यांचा निषेध देखील करण्यात येणार आहे.





