Katraj Woman Murder Case : कात्रज खुनाची मिस्ट्री सुटली! रिक्षाचालकासह सहाजण अटकेत; नेमकं काय घडलं? पाहा
Katraj Woman Murder Case : कात्रज घाटातील 'त्या' रिक्षाचा पाठलाग करून पोलिसांनी ६ आरोपींना ठोकल्या बेड्या; रिक्षाचालकाने ओळख लपवण्यासाठी बदलले होते हूड.

Katraj Woman Murder Case – कात्रज भागातील मांगडेवाडीजवळ मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला असून रिक्षाचालकासह सहाजणांना अटक केली आहे. खूनानंतर पकडले जाण्याची भीतीने रिक्षाचालकाने रिक्षाच्या छतावरील हूड बदलले होते. या प्रकरणी रिक्षाचालक केशव कमलेश चौधरी (वय २०, रा. भारतनगर, कात्रज), सोनू लक्ष्मण पवार (वय १८),
अब्दुल मोहंमद शेख (वय २३), महादेव अर्जुन व्होरडे (वय ४०), साई अमित पुजारी (वय १९), सोहेल हनिफ खान (वय २१) यांना अटक झाली आहे. साई पुजारी, सोनू पवार हे सराइत आहेत. मांगडेवाडीतील खाणीत एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना १० फेब्रुवारी रोजी सापडला होता.
सुरुवातीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली. गुन्हे शाखा याचा समांतर तपास करत होते. मात्र, धागेदाेरे सापडले नाहीत. कात्रज घाटासह परिसरातील ९७ ठिकाणच्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले होते. चित्रीकरणात रिक्षा आढळून आली होती. या रिक्षाचा क्रमांकावरुन तपास करण्यात आला.
रिक्षा चालक चौधरीला ताब्यात घेतल्यावर त्याने साथीदारांच्या मदतीने महिलेला खाणीत ढकलून दिल्याची कबुली दिली. पकडले जाण्याची भीतीने त्याने रिक्षाचे हुड बदलले होते. पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक संजय जाधव, विजय पवार, विशाल दळवी, प्रवीण उत्तेकर, साधना ताम्हाणे, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, योगेश मांढरे, संदीप शिर्के यांनी ही कामगिरी केली.
खुनाचे कारण काय ?
कात्रजमध्ये १० फेब्रुवारी रोजी महिलेने रिक्षा थांबविली. तिने कात्रज परिसरातील एका हाॅटेलजवळ सोडण्यास सांगितले. रिक्षाचालक चौधरीचे साथीदार अब्दुल शेख, सोनू पवार हे रिक्षात होते. शेख आणि पवार यांनी मद्यप्राशन केले होते. महिलेला सोडण्याचा बहाणा करुन आरोपींनी तिला मांगडेवाडी परिसरात नेले. आरोपींनी महिलेवर अतिप्रसंग केल्याची शक्यता आहे. महिलेने विरोध केल्यानंतर तिला खाणीत ढकलून दिल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.





