Pune Politics : निवडणुकीपूर्वी पुण्यात राष्ट्रवादीला मोठा झटका, कात्रज विकास आघाडीही फुटली; असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. पुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडी देखील फुटली आहे. कात्रज विकास आघाडी चे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
ठाण्यातील महापौर निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष नमेश बाबर यांच्यासह काही सरपंचांनी तसेच राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि अनिल कोंढरे, गणेश मोहिते, सिद्धार्थ वंशी, तानाजी दांगट, निलेश धनावडे, नितीन कोमन, गणपततात्या गुजर, भालचंद्र पवार आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी संग्राम बाबर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी धनुष्य बाण हातात घेतला आहे.
या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहण्याचा खुलेपणाने निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही बाळासाहेबांवर प्रेम केले, त्यांच्यावर श्रद्धा ठेवली, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, जर त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम केले असते, तर त्यांना नरक किंवा स्वर्गातला नरक पाहण्याची वेळ आली नसती. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केली, म्हणूनच आम्हाला दुसरे पाऊल उचलावे लागले. आमच्या त्या कृतीचे जनतेने स्वागत केले. काँग्रेससोबत जाण्याचे पाप त्यांनी केले. पुढे ते पाप लपवण्यासाठी तुम्ही किती वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करणार? असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.
इंडिया आघाडी लोकसभेनंतर तुटली आहे. आता ती कुठे आहे? आज प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. भारतीय लष्कराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे, यापुढे अतिरेकी हल्ला झाला तर ते युद्ध समजले जाईल. परिणामी, ‘ऑपरेशन सिंदूर’ दहशतवाद संपत नाही तोपर्यंत सुरूच राहणार, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.





