Katraj Tunnel Murder : प्रियकराचे क्रूर पाऊल! प्रेमसंबंध तोडल्याचा असा घेतला बदला; आरोपीला बेड्या
Katraj Tunnel Murder : कामधंदा करत नसल्याने मनीषाने तोडले होते संबंध; रागाच्या भरात प्रियकराने कात्रज बोगद्याजवळ दोरीने आवळला गळा.

Katraj Tunnel Murder – प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एका तरुणीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली आहे. यातील फरार आरोपीला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मनीषा खम्म दमाई ( २५, रा. आयुषी कॉम्प्लेक्स, पारी कंपनी चौक, नऱ्हे) असे मृत तरुणीचे नाव आहे. प्रकाश अर्जुन तिखात्री ( ३०, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. ढकारी, जि. आछम, नेपाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी किशन भरत परिहार ( ३५, रा. मानाजीनगर, नऱ्हे) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनीषा आणि आरोपीमध्ये प्रेमसंबंध होते. आरोपी कोणताही व्यवसाय, कामधंदा करत नसल्याने मनीषाने त्याच्याशी संबंध तोडले होते. यामुळे आरोपी तिच्यावर राग धरून होता. १८ मार्च रोजी आरोपीने मनीषाला नऱ्हे परिसरातून भेटण्याच्या बहाण्याने बोलावले. गोड बोलून तिला कात्रज बोगद्याजवळील एका हॉटेलच्या मागील दाट झाडीत नेले.
तेथे दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने दोरीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, झाडीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते व सहायक आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी करत आहेत.





