Katraj-Navale Bridge Road: कात्रज-नवले पूल मार्गावर खड्डे अन चिखलाचा विळखा; पुलाच्या कामामुळे रस्त्याची झाली चाळण
Katraj-Navale Bridge Road: पावसाच्या पाण्यामुळे पुलाच्या बांधकाम साईटवरील माती थेट रस्त्यावर; दुचाकी वाहने घसरून अपघातांचे प्रमाण वाढले.

Katraj-Navale Bridge Road : कात्रज चौकातून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी आणि बाजूच्या मातीमुळे झालेला चिखल यामुळे या मार्गावरील वाहतूक संथ झाली असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या या भागात सुरू असलेल्या कामामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत.
पावसामुळे ही माती वाहून थेट रस्त्यावर येत असून संपूर्ण मार्ग चिखलमय झाला आहे. परिणामी दुचाकीस्वारांना वाहन चालविताना घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर चारचाकी आणि अवजड वाहनांनाही सावधगिरीने मार्ग काढावा लागत आहे. रस्त्यातील खोल खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी झाला असून सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतुकीची कोंडी होत आहे. विशेषतः कात्रज चौक ते नवले पूल या दरम्यान मालवाहू ट्रक,
बस, खासगी वाहने आणि दुचाकींची मोठी वर्दळ असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. पावसाच्या सरी सुरू असताना खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताची शक्यताही वाढली आहे. रस्त्यावर उडणाऱ्या चिखलामुळे पादचारी आणि वाहनचालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी संबंधित यंत्रणेकडे तातडीने खड्डे बुजविणे, रस्त्यावर साचलेली माती हटविणे आणि बांधकामस्थळी योग्य सुरक्षाव्यवस्था करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता समतल करून वाहतूक सुरळीत करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.





