वस्तुस्थिती : कातकरी वाचवा

भारतात “हो’ जातीचे आदिवासी अत्यंत कमी संख्येचे. अंदमान-निकोबार येथे फक्त 14 लोक आहेत आणि हे लोक जगवण्यासाठी, ही जमात वाढवण्यासाठी भारत सरकारचा आदिवासी विभाग, समाजकल्याण विभाग अनेक मार्गाने अनेक योजनेअंतर्गत मदत करीत आहे.
महाराष्ट्रात 400 पेक्षा जास्त आदिवासी जाती-जमाती असून कातकरी ही इतर आदिवासी जमातींपैकी अत्यंत कमी संख्येची जमात आहे. महाराष्ट्र राज्यात कातकरी जमात प्रामुख्याने आढळून येते. ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात तसेच रायगड जिल्ह्यातील पेण-पनवेल-कर्जत येथे कातकरी जमात आढळते. पुणे जिल्ह्यातील मुळशी-वेल्हे-भोर-मावळ या तालुक्यांतही आढळते. वीटभट्टीवर काम करणे, कोणाच्या शेतात मजुरी करणे हे या लोकांचे मुख्य काम. हे राहतात जंगलात. स्वतःचे घर नाही, स्वतःची शेतजमीन नाही. त्यामुळे वनखाते जितके दिवस राहण्याची परवानगी देईल तितके दिवस राहणे अन्यथा दुसऱ्या ठिकाणी जाणे.
संसाराची सतत फिरती. यांच्यात कुणी पुढारी नाही, म्हणून आम्ही शिक्षणतज्ज्ञ प्रा. राम डिंबळे यांच्या नेतृत्वाखाली कामकरी समाजाच्या घराचा सर्व्हे करून कातकरी समाजाला घरे द्यावीत, असा एक प्रकल्प अहवाल केंद्रीय आदिवासी विभागाला दिला. यावर आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पन्नासपेक्षा जास्त बैठका झाल्या. पण काहीही निष्कर्ष निघाला नाही. आम्ही फक्त मुळशी तालुक्यात शंभर घरे बांधून द्या, एवढीच मागणी केली होती. शेवटी 19 डिसेंबरपासून दिल्लीच्या जंतर-मंतर येथे बेमुदत धरणे धरले.
आमची मागणी होती की आदिवासींना शंभर घरे बांधून देऊन त्या घरांचे गावठाण निर्माण करावे. गावात शाळेपासून सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात. अधिकारी धरणेस्थळी रोज भेटायचे. करू-बघू-तुम्ही धरणे सोडा म्हणायचे. असे करता करता 23 डिसेंबरला अधिवेशनच बंद झाले. मग आम्ही काय करायचे, असा प्रश्न पडला पण आम्ही धरणे सोडलेच नाही. आजही तेथे चक्री धरणे आंदोलन चालूच आहे. आदिवासींसाठी हजारो कोटी रुपयांच्या योजना असताना पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कातकऱ्यांना जर स्थिर घरेसुद्धा मिळू शकत नसतील तर कातकरी समाजाची संस्कृतीच नष्ट होण्याच्या मार्गावर असेल, असे दिसून येते.





