मुंबई : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची ही जागा रिक्त झाली आहे. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या रणांगणात आता करुणा शर्मा यांची एंट्री झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत त्या शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रणांगणात येत आहेत. करुणा शर्मा यांनीच हा पक्ष स्थापन केलेला आहे. पक्ष स्थापनेनंतर थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उतरल्याने करुणा शर्मा यांची आणि त्यांच्या पक्षाचीही चर्चा सध्या राज्यात होत असल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून सत्यजित (नाना) कदम यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या दहा वर्षापासून नाना कदम हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत. 2014 सत्यजित (नाना) कदम यांनी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. सत्यजित (नाना) कदम हे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नातेवाईक आहेत.