Dheeraj Deshmukh : लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख; सलग दुसऱ्यांदा निवड
डिसेंबर २०२१ मध्ये धीरज देशमुख यांची पहिल्यांदा बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वांत तरुण जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता.

Dheeraj Deshmukh – लातूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचा कणा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी अविनाश बाळासाहेब जाधव यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीमुळे बँकेच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटली असून, सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाभरातून नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने विरोधी परिवर्तन पॅनलवर मात करत बहुमत मिळवले होते. बुधवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेत अध्यक्षपदासाठी धीरज देशमुख, तर उपाध्यक्षपदासाठी अविनाश जाधव यांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
सहकार पॅनलच्या विजयाने बँकेच्या कारभारात सातत्य राखण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या निवडीकडे केवळ राजकीय यश म्हणून नव्हे, तर शेतकरी, सभासद आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाची पावती म्हणून पाहिले जात आहे.
पाच वर्षांच्या कार्याची पावती
डिसेंबर २०२१ मध्ये धीरज देशमुख यांची पहिल्यांदा बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वांत तरुण जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता.
तरुण नेतृत्व, आधुनिक दृष्टिकोन आणि सहकार क्षेत्रातील कामकाजाची जाण यांच्या जोरावर त्यांनी बँकेच्या कारभारात वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या पाच वर्षांत बँकेचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यावर त्यांनी भर दिला.






