बंगळुरू – केरळमधील भूस्खलनग्रस्त वायनाडसाठी कर्नाटक सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. भूस्खलनामुळे बेघर झालेल्यांसाठी वायनाडमध्ये १०० घरे बांधण्याचा निर्णय त्या सरकारने घेतला आहे. कॉंग्रेसशासित कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी डाव्या पक्षांची सत्ता असणाऱ्या केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्याशी संपर्क साधून त्या राज्याच्या पाठिशी उभे राहण्याची ग्वाही दिली. कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी केले. राहुल आणि प्रियंका यांनी नुकताच वायनाडचा दौरा करून भूस्खलनग्रस्तांची विचारपूस केली. मागील लोकसभेत राहुल यांनी खासदार म्हणून वायनाडचे प्रतिनिधित्व केले. यावेळी दोन मतदारसंघांमधून विजयी झाल्याने त्यांनी वायनाडची जागा सोडली. आता तिथे होणारी पोटनिवडणूक प्रियंका लढवणार आहेत. वायनाडमधील भूस्खलनात २०० हून अधिक जण मृत्युमुखी पडले. अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. भूस्खलनग्रस्त भागांत शनिवारी पाचव्या दिवशीही शोध आणि बचाव कार्य सुरू होते.