बंगळुरू – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकताच कर्नाटकमध्ये मतदार वगळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. त्यावरून चौकशी करण्यासाठी कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकार पुढे सरसावले आहे. त्या सरकारने संबंधित प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. कर्नाटकात वर्ष २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत बाजी मारून कॉंग्रेसने त्या राज्याची सत्ता हस्तगत केली. मात्र, त्या निवडणुकीआधी आलंद मतदारसंघातील ६ हजार १८ मतदार वगळण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा राहुल यांनी गुरूवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला. तो प्रकार कॉंग्रेसचा प्रभाव असणाऱ्या १० मतदान केंद्रांशी संबंधित भागात घडल्याचेही त्यांनी म्हटले. विशेष म्हणजे, आलंदमध्ये कॉंग्रेसचा विजय होऊनही राहुल यांनी तेथील विषय उपस्थित केला. त्यामागे निकाल गौण असून आपण लावून धरलेला मतचोरीचा मुद्दा महत्वाचा असल्याचा संदेश त्यांनी दिल्याचे मानले जाते. राहुल यांनी आलंदचा विषय उपस्थित केल्यानंतर तेथील कॉंग्रेसचे आमदार बी.आर.पाटील यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यांनी २५६ केंद्रांवरील ६ हजार ६७० मतदारांना अवैधरित्या याद्यांमधून वगळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यांच्या तक्रारी पाठोपाठ कर्नाटक सरकारने एसआयटी स्थापन करण्याची घडामोड घडली. कॉंग्रेस आणि विशेषत: राहुल कथित मतचोरीवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहेत. आता तो लढा पुढे नेण्यासाठी पक्षाच्या कर्नाटकमधील सरकारनेही पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.