Yuvraj Singh Apology : युवराज सिंगने कपिल देव अन् धोनीची मागितली माफी! नेमकं कारण काय? जाणून घ्या
Yuvraj Singh Apology : युवराज सिंगने कपिल देव आणि एमएस धोनी यांची माफी मागितली आहे.

Yuvraj Singh Apology MS Dhoni Kapil Dev : भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने अखेर आपल्या वडिलांच्या वादग्रस्त विधानांवर मौन सोडले आहे. त्याचे वडील योगराज सिंग यांनी वारंवार एमएस धोनी आणि कपिल देव यांच्यावर केलेल्या जहरी टीकेबद्दल युवीने सार्वजनिकरीत्या माफी मागितली आहे.
योगराज सिंग यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंना, विशेषतः एमएस धोनी आणि कपिल देव यांना लक्ष्य केले आहे. आपल्या मुलाचे (युवराजचे) करिअर धोनीमुळेच संपले, असा गंभीर आरोप ते वारंवार करत आले आहेत. मात्र, आता युवराज सिंगने या वादात उडी घेत आपल्या वडिलांच्या वागणुकीबद्दल खेद व्यक्त केला आहे. ‘स्पोर्ट्स तक’ने जारी केलेल्या एका नवीन पॉडकास्टच्या टीझरमध्ये युवराजने स्पष्टपणे म्हटले आहे की, “मला कपिल देव आणि एमएस धोनीची माफी मागायची आहे.”
“बाबांना मी बजावलंय…”
युवराजने पहिल्यांदाच या संवेदनशील विषयावर भाष्य करताना सांगितले की, वडिलांचा स्वभाव आणि त्यांचे शब्द यामुळे त्यालाही त्रास होतो. तो म्हणाला, “मी माझ्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले आहे की, तुम्ही जे बोलताय ते अजिबात योग्य नाही.” योगराज सिंग यांची धोनीवरील नाराजी सर्वश्रुत आहे, परंतु अलीकडे त्यांनी कपिल देव यांच्याबद्दलही खळबळजनक दावे केले होते. ८० च्या दशकात कपिल देव यांनी आपल्याला संघातून काढल्यामुळे आपण त्यांच्या घरी पिस्तूल घेऊन गेलो होतो, असा धक्कादायक खुलासाही योगराज यांनी केला होता.
योगराज सिंग यांच्या भूमिकेत अचानक बदल?
धोनीवर वर्षानुवर्षे टीका करणाऱ्या योगराज सिंग यांनी अलीकडेच एक अनपेक्षित विधान केले आहे. एमएस धोनीने आपली फिटनेस सिद्ध केली असून त्याने पुढील १० वर्षे आयपीएल खेळत राहावे, असे त्यांनी म्हटले आहे. वडिलांच्या या परस्परविरोधी विधानांमुळे आणि भूतकाळातील कडवटपणामुळे युवराजची कोंडी होत होती, ज्यावर त्याने आता माफी मागून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या पॉडकास्टमध्ये युवीने विराट कोहली, रोहित शर्मा आणि युवा खेळाडू अभिषेक शर्मा यांच्याबद्दलही अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत.





