Kanhaiya Kumar: आमच्या मुलीचे लग्न आहे का? अभिजित दीपकेंच्या निमंत्रणावरून कन्हैय्या कुमार का भडकले?
Kanhaiya Kumar: न पढे है, न पढने देंगे हीच भाजप सरकारची भूमिका असून, शिक्षणाचा मूलभूत अधिकारच हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Kanhaiya Kumar – न पढे है, न पढने देंगे हीच भाजप सरकारची भूमिका असून, शिक्षणाचा मूलभूत अधिकारच हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाळेत शिकवण्यासाठी चांगले गुरुच उपलब्ध नाही आणि आपण विश्वगुरु होण्याचे स्वप्न पाहत आहे. शाळांमधील सोयीसुविधांचा दर्जा घसरत चालला असून देशातील शिक्षणव्यवस्था आयसीयूमध्ये आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते कन्हैय्या कुमार यांनी केला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाऱ्या छात्रो की गुंज कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कन्हैय्या कुमार यांची काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये कन्हैय्या कुमार यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली. शिक्षणाचा दर्जा घसरत असून शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. पदवी घेतल्यानंतरही तरुणांना रोजगार मिळत नाही,
हे वास्तव असून चांगले शिक्षण देण्यामध्ये भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कन्हैय्या कुमार यांनी केला. देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून मोठी भाषणे करतात; मात्र, देशभरातील शाळा का बंद होत आहेत, देशात वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. शिक्षण महाग झाले आहे, यावर ते बोलत नाहीत. शिक्षित भारतातूनच विकसित भारत निर्माण होईल आणि त्यातूनच भारत विश्वगुरू होऊ शकतो, असेही कुमार यांनी म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओने भरकटणार नाही…
सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याबाबत फिरणाऱ्या कथित व्हिडिओवरूनही देखील कन्हैय्या कुमार यांनी भाजपवर टीका केली. एक भाजपचा कार्यकर्ता व्हिडिओ बनवतो आणि दुसरा तो व्हायरल करतो. आजची युवा पिढी अशा व्हायरल व्हिडिओने भरकटणार नाही. ३० जाचक अटी घालून कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न डेहराडूनमध्येही करण्यात आला प्रत्येक कार्यक्रमाला अडथळे निर्माण करून आवाज दाबता येणार नाही, असेही कन्हैय्याकुमार यांनी सांगितले.
काॅकरोजला निमंत्रण द्यायला आमच्या मुलीचे लग्न आहे का…
काँकरोज जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांना राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे का? असा प्रश्न विचारला असता कन्हैय्या कुमार म्हणाले की, आमच्या मुलीचे लग्न आहे का, निमंत्रण द्यायला? जे येतील त्यांचे स्वागत आहे. निवडणुका हा वेगळा विषय आहे. संघर्षाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत. देश गंभीर संकटातून जात आहे आणि तो वाचविण्यासाठी आम्ही लढत आहोत.






