Kane Williamson | केन विल्यमसनने सोडले न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व

ऑकलंड – आंतरराष्ट्रीय क्रिकेट मौसमात येत्या काळात होत असलेल्या कसोटी मालिकांपूर्वीच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. एकदिवसीय व टी-20 सामन्यांत मात्र, तोच कर्णधारपदी कायम राहणार आहे. न्यूझीलंडचा संघ येत्या काळात पाकिस्तानचा दौरा करणार असून यापूर्वी न्यूझीलंड संघात मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
विल्यमसनच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी संघाचे नेतृत्व करणार आहे. टॉम लॅथम याला उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. वर्कलोड व्यवस्थापन तसेच सातत्याने होत असलेल्या मालिका पाहता कोणत्याही एका प्रकारातून नेतृत्व सोडण्याचा विचार यापूर्वीच मनात आला होता त्यामुळे कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला, असे विल्यमसनने सांगितले.
साऊदी हा न्यूझीलंडचा 31 वा कसोटी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका 26 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीत होईल.
कसोटी संघाचे कर्णधारपद हाती घेतल्यानंतर विल्यमसनने 6 वर्षांनी पद सोडले आहे. 2016 साली त्याच्याकडे ब्रेंडन मॅक्युलमनंतर कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. विल्यमसनने 38 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान न्यूझीलंडने 22 कसोटी सामने जिंकले. विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने गेल्या वर्षी अंतिम फेरीत भारताचा पराभव करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती.





