Kalyan News: ‘मराठी माणसं भिकारी’ म्हणत हिंदी भाषिकाची मराठी व्यक्तीला मारहाण, नेमकं प्रकरण काय?

Kalyan Crime News : कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत धूप लावल्यामुळे वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने सोसायटीत राहणाऱ्या अभिजित देशमुख या मराठी व्यक्तीला मारहाण केली. अखिलेश यांनी गुंड बोलवून रॉडने मारहाण केली व धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत अभिजित देशमुख जखमी झाले आहेत.
तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात. तुमचे मराठीपण बाहेर काढतो, असे म्हणत अखिलेश यांनी धमकी दिल्याचा आरोप केला जात आहे. अखिलेश हे स्वतः सरकारी अधिकारी असल्याचे सांगतात. तसेच, मी मंत्रालयात कामाला आहे, पोलिस पण मला घाबरतात. तुझ्यासारखे 56 मराठी माझ्यासमोर झाडू मारतात, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
नेमका वाद काय?
कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत अखिलेश गुप्ता व अभिजित देशमुख हे दोघेही राहतात. अखिलेश यांच्या पत्नी देवपूजा केल्यानंतर धूप लावतात. धूपाचा धूर घरात जात असून, यामुळे त्रास होत असल्याचे सोसायटीतील वर्षा कळवीकट्टे यांनी अखिलेश यांच्या पत्नीला सांगितले. मात्र, याचे रुपांतर वादात झाले.
यावेळी याच सोसायटीत राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी अखिलेश यांनी 7-8 जणांना बोलवून अभिजित देशमुख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, शिवीगाळ करत धमकी दिली. या घटनेत अभिजित देशमुख जखमी झाले आहेत.
या प्रकरणात दोन्ही पक्षाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मनसेची आक्रमक भूमिका
परप्रांतिय व्यक्तीकडून मराठी माणसाला मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्यानंतर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी शुक्ला यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. 24 तासात हल्लेखोरांना अटक न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.





