Kailash Vijayvargiya : “साखर खूप महाग झाली पाहिजे, 40 ओलांडलेल्यांनी साखर खाऊच नये”; ‘या’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
सण-उत्सवांच्या तोंडावर साखरेच्या वाढत्या दरावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच, मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी एका विधानाद्वारे नव्या वादाला तोंड दिले आहे.

Kailash Vijayvargiya : सण-उत्सवांच्या तोंडावर साखरेच्या वाढत्या दरावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच, मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी एका विधानाद्वारे नव्या वादाला तोंड दिले आहे.
साखर प्रत्यक्षात खूप महाग झाली पाहिजे आणि ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी साखरेचे सेवन पूर्णपणे बंद केले पाहिजे, असे प्रतिपादन विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केले.
विजयवर्गीय यांनी दावा केला की, बाजारात साखरेचे भाव सातत्याने घसरत आहेत. हलक्या फुलक्या सुरात भाष्य करताना ते म्हणाले, आजकाल ९० टक्के लोकांना गोड पदार्थ आवडत नाहीत. मी स्वतः तर गोड पदार्थ अजिबात खात नाही. मी तर म्हणतो की, सरकारने साखरेचे दर खूप वाढवले पाहिजेत.
स्वस्त धान्य दुकानांतून फक्त लहान मुलांसाठीच स्वस्त दरात साखर उपलब्ध करून दिली पाहिजे; तर ज्येष्ठांना साखर अजिबात दिली नाही पाहिजे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते ४० वर्षांवरील व्यक्तींसाठी साखर आरोग्यासाठी योग्य नाही, असा दाखला देत ते पुढे म्हणाले, जर तुमचे वय ४० पेक्षा जास्त असेल तर तुम्ही कधीतरी गूळ खाऊ शकता, पण साखरेपासून पूर्णपणे दूर राहिले पाहिजे.
काँग्रेसचा कडाडून हल्ला
विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांच्या या विधानावर मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी कडाडून हल्ला चढवला. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले भाजप नेते आता गरीब आणि मध्यमवर्गीयांची थट्टा उडवत आहेत, असा आरोप पटवारी यांनी केला. देशातील जनता भाजप नेत्यांची ही विधाने पाहत असून येत्या निवडणुकीत जनतेच्या उत्तराने या नेत्यांचे हसणे गायब होईल, असा इशाराही त्यांनी दिला.






