Pune Crime : काँग्रेस-एनएसयूआयच्या 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा; पत्रकाराविरूद्धही तक्रार, COEP वसतिगृहातील राड्याला नवे वळण
Pune Crime : COEP वसतिगृहातील राडा प्रकरणी काँग्रेस-एनएसयूआयच्या सुमारे १५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांविरुद्धही विद्यापीठाची तक्रार.

Pune Crime : सीओईपी विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या व्हिडिओवरून सुरू झालेल्या वादाला आता वेगळे वळण मिळाले आहे. वसतिगृह परिसरात विनापरवानगी प्रवेश करून घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की तसेच विद्यार्थ्यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आणि एनएसयूआयच्या सुमारे १५० कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी वसतिगृह परिसरात गेलेल्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींविरुद्धही विद्यापीठ प्रशासनाने तक्रार केली आहे.
विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (वसतिगृह विभाग) डॉ. राजू पाचकोर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सीओईपीच्या वसतिगृह परिसरात सुमारे दहा इमारती असून, त्यामध्ये सुमारे दोन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी राहतात. वसतिगृह परिसरात बाहेरील व्यक्तींना पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही. सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
१९ ऑगस्टच्या घटनेनंतर वादाला सुरुवात –
१९ ऑगस्ट रोजी एनएसयूआयच्या काही कार्यकर्त्यांनी एका विद्यार्थिनीचा तिच्या इच्छेविरुद्ध व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. संबंधित विद्यार्थिनीचा प्रवेश अनाथ विद्यार्थी कोट्यातून झालेला असतानाही तिच्याकडून सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे शुल्क आकारले जात असल्याचा अपप्रचार करण्यास तिला भाग पाडल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यापीठाची बदनामी झाल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.
त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी एनएसयूआयचे कार्यकर्ते वसतिगृहाच्या गेटवर आले. त्यांनी गेट जबरदस्तीने उघडून सुरक्षा रक्षकांना धक्का देत वसतिगृह परिसरात प्रवेश केला. त्यानंतर विद्यार्थिनींच्या वसतिगृहासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला वसतिगृह परिसरातून बाहेर काढले.
माध्यम प्रतिनिधींवरही तक्रार; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न –
दरम्यान, या प्रकरणात माध्यम प्रतिनिधींविरुद्धही तक्रार करण्यात आल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थिनीच्या शुल्काबाबतचा वाद आणि त्यानंतर वसतिगृहात झालेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर ‘विनापरवानगी प्रवेश’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वसतिगृहाची सुरक्षा राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असली, तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींविरुद्धही तक्रार दाखल करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.





