Kailash Gehlot : कैलाश गेहलोत भाजपमध्ये दाखल; म्हणाले, “मी कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही..”

Kailash Gehlot – ‘मी कुणाच्यातरी दबावाखाली निर्णय घेतला आहे, असा नॅरेटिव्ह तयार करण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत. मात्र, हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजपर्यंत मी कुणाच्याही दबावाखाली काम केले नाही, त्यामुळे हा गैरसमज काढून टाकावा’, असे कैलाश गेहलोत म्हणाले.
दिल्लीचे माजी मंत्री असलेल्या कैलाश गेहलोत यांनी रविवारी आम आदमी पक्षाला सोडचिट्ठी दिली. त्यांनी सोमवारी अधिकृतपणे भाजपाचे सदस्यत्व स्वीकाराले. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देणे सोपे नसल्याचे सांगितले.
ते म्हणाले, ईडी किंवा सीबीआयचा माझ्यावर दबाव असल्याने मी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला, हे चुकीचे आहे. मी व्यवसायाने वकील आहे. मी कायद्याच्या प्रॅक्टिसला सोडून माझ्या जुन्या पक्षातील व्यक्तीवर विश्वास ठेवला, मात्र राजकीय महत्वकांक्षेपायी त्यांनी चांगल्या लोकांना बाजूला करायला सुरुवात केली, असे ते बोलताना म्हणाले.
जनतेशी बांधिलकी विसरले…
रविवारी कैलाश गेहलोत यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देताना पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहिताना, पक्ष सोडण्याचा कारणांचा पाढा वाचला होता. या पत्रात गेहलोत यांनी आम आदमी पक्ष जनतेची बांधिलकी विसरला असल्याचा आरोप केला.
गेहलोत यांनी शीशमहलचा मुद्दा उपस्थित करताना अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर कैलाश गेहलोत आम आदमी पक्षापासून दूर गेले.. पक्षाला रामराम करताना त्यांनी पक्षाच्या कार्य पद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.





