Kaas Pathar: कास पठारावर रंगणार फुलांचा उत्सव! यंदा पर्यटकांसाठी काय आहे खास? जाणून घ्या
Kaas Pathar: जागतिक वारसास्थळ कास पठारावर आगामी पुष्प हंगामाची लगबग; उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्याकडून विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी

Kaas Pathar – पावसाची चाहूल लागली की जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर हिरवाईची चादर ओढून विविधरंगी फुलांची चाहूल लागते. फुलांच्या आगमनाबरोबरच कास पठाराचे व्यवस्थापन बघणाऱ्या कास समितीची हंगामाच्या तयारीसाठी गडबड सुरू होते. आगामी पुष्प हंगामाच्या तयारीसाठी सातारचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी कासचा दौरा करून हंगामासाठी सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत एसीएफ प्रदीप रौंदळ, मेढा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष पाटील, सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, बामणोली वनपाल उज्वला थोरात, वनरक्षक समाधान वाघमोडे, वनरक्षक प्रकाश शिंदे, समितीचे सदस्य प्रदीप कदम, दत्तात्रय किर्दत आदी उपस्थित होते. पर्यटकांसाठी समितीमार्फत देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची पाहणी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी यावेळी केली तसेच समितीने कास परिसरात केलेल्या कामांचा आढावा घेतला.
पर्यटकांच्या स्वागतासाठी उभारलेली कास पठार स्वागत कमान, पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या नवीन वॉशरूमची पाहणी, बघदरतळे ते मंडपगड नवीन पायवाटांची पाहणी, कुमुदिनी येथील वॉच टावर, कासानी पार्किंग आणि कास तलावाजवळील पार्किंगची पाहणी केली. पर्यटकांसाठी जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील, आगामी पुष्प हंगाम यशस्वी करण्यासाठी काय करता येईल याबाबत समितीला मार्गदर्शन केले.




