Jute Farmers: केंद्र सरकारने कच्च्या तागाच्या (Jute) किमान आधारभूत किमतीत (MSP) मोठी वाढ जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) बैठकीत २०२६-२७ मार्केटिंग सीझनसाठी कच्च्या तागाच्या MSP ला मंजुरी देण्यात आली. किती झाली MSP मध्ये वाढ? नव्या निर्णयानुसार, २०२६-२७ सीझनसाठी कच्च्या तागाचा किमान आधारभूत भाव ५,९२५ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. गेल्या सीझनच्या (२०२५-२६) तुलनेत हे २७५ रुपयांनी अधिक आहे. कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या (CACP) शिफारशींच्या आधारे ही वाढ करण्यात आली असून उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा शेतकऱ्यांना मिळावा, हा यामागील उद्देश आहे. कोणत्या राज्यांना होणार फायदा? भारतात तागाला ‘गोल्डन फायबर’ म्हणजेच सुवर्ण तंतू असे संबोधले जाते. पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, ओडिशा आणि मेघालय या राज्यांमध्ये तागाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. या नव्या भाव वाढीचा थेट फायदा याच राज्यांतील शेतकऱ्यांना होणार आहे. इको-फ्रेंडली पॅकेजिंगला चालना – प्लास्टिकच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात पर्यावरणपूरक पर्यायांना मागणी वाढत आहे. सरकारने आधीच धान्य आणि साखरेच्या पॅकेजिंगसाठी तागाच्या गोण्यांचा वापर अनिवार्य केला आहे. MSP वाढल्याने ताग उत्पादन वाढेल आणि ‘प्लास्टिकमुक्त भारत’ अभियानाला बळ मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. JCI करणार खरेदीचे नियोजन – कॅबिनेटच्या या मंजुरीनंतर जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (JCI) सक्रिय होणार आहे. केंद्र सरकारची नोडल एजन्सी म्हणून JCI राज्य सरकारांच्या यंत्रणांसोबत समन्वय साधून ब्लॉक स्तरावर खरेदीची रूपरेषा तयार करणार आहे. नवीन पीक बाजारात आल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांकडून थेट नव्या MSP वर खरेदी सुरू होईल. शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, काही शेतकरी संघटनांनी सरकारी खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणीही केली आहे.