PM मोदींची शेतकऱ्यांना दोन दिवसांत दुहेरी भेट, 14 पिकांचा MSP वाढला

Cabinet approved New MSP: तिसरी टर्म सुरु झाल्यानंतर दोन दिवसांतच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना दुहेरी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने चालू पीक हंगामासाठी म्हणजेच 2024-25 साठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, धानाच्या किमान आधारभूत किमतीत 117 रुपयांनी वाढ करून 2300 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. यात 5.35 टक्के वाढ झाली आहे.
#WATCH | On Union Cabinet decisions, Union Information & Broadcasting Minister Ashwini Vaishnaw says, “The Cabinet has approved Minimum Support Price (MSP) on 14 Kharif season crops including Paddy, Ragi, Bajra, Jowar, Maize and Cotton.” pic.twitter.com/OObQUGdC3s
— ANI (@ANI) June 19, 2024
मोदी सरकार-3.0 च्या दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भात, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका यासह 14 खरीप पिकांच्या नवीन किमान आधारभूत किमती (MSP) आणि कापसाला MSP मंजूर करण्यात आला आहे. एमएसपी वाढीची घोषणा करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या (CACP) शिफारशींवर आधारित मंत्रिमंडळाने 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती मंजूर केल्या आहेत.
सरकारकडे तांदळाचा अतिरिक्त साठा असूनही धानाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीसारख्या राज्यांतील निवडणुकांपूर्वी हे निर्णय महत्त्वाचे मानले जात आहे. वैष्णव म्हणाले की, आगामी खरीप हंगामासाठी, ‘सामान्य’ ग्रेडच्या धानासाठी एमएसपी 117 रुपयांनी वाढवून 2,300 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे, तर ‘अ’ श्रेणीसाठी तो 2,320 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.
वैष्णव म्हणाले की, सरकारने 2018 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात MSP उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट असावा असा स्पष्ट धोरणात्मक निर्णय घेतला होता आणि MSP मध्ये नवीनतम वाढीमध्ये हे तत्व पाळले गेले आहे. सीएसीपीने शास्त्रोक्त पद्धतीने किंमत मोजली असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, ते म्हणाले की भारतीय अन्न महामंडळाकडे सध्या सुमारे 53.4 दशलक्ष टन तांदळाचा विक्रमी साठा आहे, जो 1 जुलैसाठी आवश्यक असलेल्या बफरच्या चार पट आहे आणि कोणत्याही नवीन खरेदीशिवाय वर्षभरासाठी पुरेसा आहे.
दरम्यान, एक दिवसापूर्वी पंतप्रधान मोदींनी PM किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याअंतर्गत 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींहून अधिक रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केली आहे.




