Justice Ujjal Bhuyan : कायदा हा आयुष्यभर शिकण्याचा प्रवास! सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे प्रतिपादन
Justice Ujjal Bhuyan : पुण्यातील एम.एम.एम. शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज ठरले राष्ट्रीय विजेते; विधी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी मूट कोर्टचे यशस्वी आयोजन.

Justice Ujjal Bhuyan – वकिली प्रतिष्ठेचा व्यवसाय असून त्यासाठी स्पष्टता, नैतिकता, शिस्त आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. कायदा हा आयुष्यभर शिकण्याचा प्रवास आहे. समानता ही संविधानाची मूलभूत संकल्पना असून प्रत्येकाला सन्मानाने वागण्याचा अधिकार असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी व्यक्त केले. नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्यच्या ॲड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर लॉ कॉलेज आणि जाधवर लॉ कॉलेजच्या सहकार्याने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय जाधवर मूट कोर्ट स्पर्धेच्या समारोपावेळी ते बोलत होते.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक, पुण्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, कौटुंबिक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश श्याम नागनाथराव रुकमे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. स्पर्धेत पुण्यातील एम.एम.एम.शंकरराव चव्हाण लॉ कॉलेजने विजेतेपद तर नाशिकमधील एनबीटी लॉ कॉलेजने उपविजेतेपद मिळवले.
भोपाळमधील रवींद्रनाथ टागोर विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट मेमोरियल पुरस्कार मिळाला. देश्ना जैन (शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे) यांना अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट वक्ता, विधी लुणावतला सर्वोत्कृष्ट संशोधक, तर रेहाना इक्बाल इमानीला प्राथमिक फेरीतील सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून गौरविण्यात आले. यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ विधीज्ञ सुधाकर आव्हाड यांचा सन्मान केला. स्पर्धेत देशभरातील २८ संघांनी सहभाग घेतला. ॲड. शार्दुल एस. जाधवर लिखित पुस्तकाचे प्रकाशन व वन मंथ कोर्स सर्टिफिकेटचे प्रकाशनही यावेळी झाले.
मूट कोर्ट स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास, वकिली कौशल्ये विकसित होण्यास मदत होते, असे ॲड. शार्दुल जाधवर यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. सपना देव यांनी केले.





