Dr. Somnath Gite: डॉ. सोमनाथ गिते यांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारा’ने सन्मान
Dr. Somnath Gite: व्यसनमुक्ती चळवळीत डॉ. गिते यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला. समाजजागृती, मार्गदर्शन आणि जनप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना व्यसनातून बाहेर काढत नवजीवन दिले आहे.

Dr. Somnath Gite: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा सन २०२१-२२ चा मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांना प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे झालेल्या समारंभात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
व्यसनमुक्ती चळवळीत डॉ. गिते यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला. समाजजागृती, मार्गदर्शन आणि जनप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना व्यसनातून बाहेर काढत नवजीवन दिले आहे. या पुरस्कारात रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशाबद्दल राज्यभरातून अभिनंदन होत आहे.
डॉ. गिते यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या कार्याची नोंद आहे. याशिवाय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, सेवादूत पुरस्कार आणि राष्ट्रीय युवा आयकॉन पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार रक्कम शाळेला देणगी –
“व्यसनामुळे उद्ध्वस्त होत असलेली अनेक कुटुंबे मी जवळून पाहिली. त्यांच्या वेदनांमधूनच समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि व्यसनमुक्तीच्या कार्याला सुरुवात केली. अनेकांना नवजीवन देण्याचा प्रयत्न हीच माझी खरी कमाई आहे. हा पुरस्कार माझ्यासह त्या प्रत्येकाचा आहे, ज्यांनी व्यसनावर मात करून नवे आयुष्य उभारले. या सन्मानामुळे जबाबदारी वाढली असून, पुढेही अधिक समर्पणाने काम करणार आहे. तसेच, या पुरस्काराची संपूर्ण रक्कम आणि त्यात माझ्या वतीने भर घालून आई वेणूताई यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी देणगी देत आहे,” असे डॉ. गिते यांनी सांगितले.

