Junnar News: जुन्नरमध्ये ढगाळ हवामानाचा पिकांना मोठा फटका; हातातोंडाशी आलेला घास हिरावणार?”

प्रभात वृत्तसेवा
बेल्हे – गेल्या तीन-चार दिवसांपासून जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरण आणि धुक्याच्या प्रादुर्भावामुळे कांदा, गहू, हरभरा यांसह अन्य पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.सततच्या हवामान बदलाचा मोठा परिणाम पिकांच्या वाढीवर होत आहे.
सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत असलेल्या ढगाळ हवामानामुळे कांद्यावर करपा, तर हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील गहू, तूर, वाटाणा, मका व हरभरा पिकांवर विविध किडींनी हल्लाबोल केल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या किडींच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा महागड्या कीटकनाशक फवारणीची वेळ आली आहे. कृषी विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांनी वेळीच पिकांची काळजी घेऊन फवारणी करावी, असे आवाहन केले आहे.
“आणे पठारावरती रब्बी हंगाम जोमात आलेला आहे. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा, ज्वारी, वाटाणा, गहू आदी पिकांवर काळा मावा, पांढरा मावा, तुडतुड्यांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. मका पिकावर लष्करी अळी वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.”
– माऊली संभेराव, शेतकरी, आणे





