Maharashtra Weather – राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असून, येत्या १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, या काळात प्रामुख्याने दुपारनंतर वातावरणात मोठे बदल होऊन वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल. विशेषतः १८ ते २० मार्च दरम्यान या नैसर्गिक घडामोडींची तीव्रता वाढणार असून, काही भागांत गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. अशातच बदलत्या हवामानाचा मोठा फटका पिकांना बसू शकतो, हे लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा आणि फळबागांना या वादळी पावसाचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान बदल या काळात वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.